नागपूर काँग्रेसचा अध्यक्ष बदलणार?

badgeप्रदेश काँग्रेसचे नवे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या दिमतीला दिलेल्या पाच कार्याध्यक्षामध्ये एक नितीन राऊत आल्याने नागपूरच्या असंतुष्ट गटाला ऊर्जा मिळाली आहे. नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांना बदलावे यासाठी गेली काही महिने असंतुष्ट नेते फिल्डिंग लावून आहेत. आता प्रदेश काँग्रेस बदलल्याने नागपूरचा अध्यक्षही बदलेल अशी चर्चा उपराजधानीत रंगली आहे.

राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात काँग्रेसमध्ये गटबाजी आहे. प्रदेश काँग्रेसमधील फेरबदलामुळे आता संघटनात्मक समीकरणे बदलणार आहेत. त्यामुळे ठिकठिकाणच्या असंतुष्टांना आपले ‘अच्छे दिन’ येणार अशी आशा वाटू लागली आहे. नागपूरच्या काँग्रेसमध्ये गेल्या काही वर्षांपासून दोन गट सक्रिय आहेत. एक गट माजी खासदार विलास मुत्तेमवार, विकास ठाकरे यांचा आहे तर दुसरा गट माजी मंत्रीद्वय सतीश चतुर्वेदी यांचा आहे. याच गटात नितीन राऊत हेही येतात. आता नितीन राऊत हेच हायकमांड बनल्याने आपल्याला न्याय मिळेल असे असंतुष्टांना वाटत आहे.

ही बातमी पण वाचा : नागपुरी तडका : मिशी कापली म्हणून न्हाव्याविरोधात गुन्हा दाखल

पूर्वीचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे असंतुष्टांशी सुरुवातीपासून जुळत नव्हते. ३ वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत अशोक चव्हाण यांच्या अंगावर शाई फेकण्यात आली होती. हे प्रकरण शेकल्याने सतीश चतुर्वेदी यांना निलंबित करण्यात आले. चतुर्वेदी यांनी या विरोधात शिस्तभंग समितीपुढे अपील करूनही विचार झाला नाही. यातून अंतर्गत कलह चिघळत गेला. समांतर पक्ष चालवून असंतुष्टांनी वेळोवेळी शक्तिप्रदर्शन केले. ह्या गटबाजीची पक्षाला गेल्या दोन्ही लोकसभा निवडणुकीत जबर किंमत मोजावी लागली. नवे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना नागपूरच्या गटबाजीची चांगली कल्पना आहे. २००८ मध्ये थोरात नागपूरचे पालकमंत्री होते तेव्हा त्यांनी ही भांडणे जवळून पाहिली आहेत. नव्या व्यवस्थेत वाद मिटावा अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. पण नेत्यांची तशी मर्जी आहे का? ‘मुत्तेमवार आमचे नेते आहेत’ असे सांगून नितीन राऊत यांनी सुरुवात तर चांगली केली आहे. विधानसभा निवडणुकीचे जागावाटप समन्यायी झाले नाही तर काँग्रेसला पुन्हा एकदा सपाटून मार खावा लागेल. नागपूरचे हेच चित्र बहुतेक जिल्ह्यांमध्ये दिसते आहे.