
मुंबई :- नागपूर येथील लॉजिस्टिक पार्क, नवी मुंबईतील एकात्मिक औद्योगिक परिसरात गुंतवणुकीच्या मोठ्या संधी उपलब्ध असून सिंगापूरच्या कंपन्यांच्या गुंतवणुकीसाठी या भागात पोषक वातावरण असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. सिंगापूरचे मुंबईतील वाणिज्यदूत गॅविन चाय यांनी आज वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टमंडळासह भेट घेतली. सिंगापूरचे वरिष्ठ मंत्री हे मुंबई भेटीवर जानेवारीमध्ये येणार आहेत. या भेटीचे निमंत्रण किट यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले.
आर्थिक सहकार्य व गुंतवणूक या क्षेत्रातील द्विपक्षीय संबंध सुधारण्याच्या दृष्टिकोनातून यावेळी चर्चा झाली. महाराष्ट्र सिंगापूर संयुक्त समितीमधील सहकार्य तसेच सिंगापूर व महाराष्ट्रातील संबंध वाढविण्याबद्दल यावेळी सकारात्मक चर्चा झाली. मुख्यमंत्री म्हणाले, नागपूरचे भौगोलिक स्थान हे लॉजिस्टिक पार्कच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असून वस्तू व सेवा कर कायद्यामुळे या स्थानाला आणखी महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच या भागात होणाऱ्या जेएनपीटीच्या सॅटेलाईट पोर्टमुळेही लॉजिस्टक क्षेत्राला चालना मिळणार आहे.
ही बातमी पण वाचा : पतंजलि आयुर्वेद कंपनी उतरणार शेअर बाजारात ?
सिंगापूरमधील लॉजिस्टक क्षेत्रातील कंपन्यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीची संधी उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे एकात्मिक औद्योगिक क्षेत्रामुळे पुढील काळात नवी मुंबई हे राज्याच्या विकासाचे प्रमुख ठिकाण होणार आहे. त्यामुळे येथेही मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत. पुण्यामध्ये सिंगापूरमधील विविध कंपन्या आहेत. पुण्याच्या मास्टर प्लॅनमध्ये या कंपन्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.