‘शिवसेना आयत्या बिळावर नागेबा’, चिपी विमानतळाच्या श्रेयावरुन नारायण राणेंची टीका

Narayan Rane & Uddhav Thackeray

मुंबई : गेली अनेक वर्षे रखडलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त सापडला आहे. येत्या 23 जानेवारी रोजी चिपी विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला उपस्थित राहणार का? असा प्रश्न विचारला असता नारायण राणे (Narayan Rane) म्हणाले की, शिवसेना (Shivsena) आयत्या बिळावर नागेबा आहे. जेव्हा या विमानतळाचं काम सुरु केलं, तेव्हा विनायक राऊतांनी (Vinayak Raut) विरोध केला होता. शिवसेनेचा या विमानतळाला विरोध होता. चिपीवर पाणी, रस्ता आणि वीज अद्याप आलेली नाही. तयारी काहीही झालेली नाही. ही तीन कामं झाल्याशिवाय एअरपोर्टचं उद्घाटन होणार नाही, असा दावा भाजपचे (BJP) खासदार नारायण राणे यांनी केला. ते एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते.

यावेळी त्यांनी आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपचाच झेंडा फडकेल, असं वक्तव्य करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या कार्यप्रणालीवर ताशेरे ओढले. ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालानंतर पुढच्या राजकारणाबाबत बोलताना नारायण राणे म्हणाले की, आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपचाच झेंडा फडकेल. भाजपनं ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये घवघवीत यश संपादीत केलं त्याबद्दल मी जनतेचे आभार व्यक्त करतो. महाविकास आघाडीवरचा लोकांचा विश्वास हळूहळू उडत चालला आहे. लोकांना आता तीन पक्षांची भांडण कळायला लागली आहेत. तसेच या सरकारच्या काळात भ्रष्टाचारही वाढू लागला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप हा एक नंबरचा पक्ष राहिला आहे. या निवडणुकांमध्ये भाजप विरुध्द तीन अशी लढाई झाली. त्यामध्ये भाजप सरस ठरला आहे. आगामी निवडणुकांमध्ये जनता महाविकास आघाडीच्या विरोधात आहेत.

काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारचं स्टेअरिंग आपल्याच हातात असल्याचा दावा केला होता. यासंदर्भात बोलताना नारायण राणे म्हणाले की, उद्धव ठाकरेंना अर्थखात्याचा अभ्यास नाही, भांडवल किती आहे? त्यांना आकडेवारी द्यायला सांगा. राज्य कसं चालतं? कशावर चालतं? याचा मुख्यमंत्र्यांना अभ्यास नाही. उद्धव ठाकरेंनी बाहेर पडून सांगावं राज्याच्या तिजोरीत किती पैसै आहेत? राज्याची अर्थव्यवस्था काय आहे? हे मुख्यमंत्र्यांनी समजावून सांगावं.

नारायण राणे यांनी यावेळी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची पाठराखण केली. चंद्रकांत पाटलांच्या मूळ गावीच त्यांचा पराभव झाल्याचं ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये पाहायला मिळालं. यासंदर्भात बोलताना नारायण राणे म्हणाले की, एक ग्रामपंचायत हातातून गेली म्हणून काही होत नाही, इतर ठिकाणी चंद्रकांत पाटलांचं काम मोठं आहे, टीका करणारे करत राहतात. चंद्रकांत पाटलांचं काम उत्तम आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER