नदाल सर्वाधिक वयाचा वर्षअखेरीचा नंबर वन टेनिसपटू

पाचव्यांदा वर्षअखेरीस अव्वल फेडरर, जोकोवीच व कॉनर्सशी बरोबरी

Nadal

एटीपी फायनल्समध्ये रॉजर फेडररने गुरुवारी नोव्हाक जोकोवीचला हरवले आणि जागतिक क्रमवारीत राफेल नदाल 2019 ला नंबर वन पदासह बायबाय करेल हे निश्चित झाले. एटीपी फायनल्स स्पर्धा जोकोवीचने जिंकली असती तर तोच नंबर वन राहिला असता पण जोको उपांत्य फेरीआधीच बाद झाला. त्यामुळे सध्या नंबर वन असलेला राफेल नदाल अंतिम फेरी न गाठताच अग्रस्थानी कायम राहिल हे निश्चित झाले. आपले अव्वल स्थान कायम राखण्यासाठी नदालने अंतिम फेरी गाठणे आवश्यक होते पण आता जोकोच्या लवकर बाद होण्याने त्याची आवश्यकता उरलेली नाही.

टेनिस क्रमवारीच्या इतिहासात 2000 पासून नवव्यांदा वर्षअखेरीचा अव्वल खेळाडू वर्षातील शेवटच्या स्पर्धेत ठरला आहे. टेनिसमध्ये वर्षअखेरीला अव्वल क्रमांकाचे विशेष महत्त्व आहे.

नदाल त्याच्या कारकिर्दीत पाचव्यांदा वर्षअखेरीस नंबर वन ठरला आहे. त्याने यंदा फ्रेंच ओपन व युएस ओपन या दोन ग्रँड स्लॅम  व दोन एटीपी मास्टर्स स्पर्धा जिंकल्या असून 4 नोव्हेंबरपासून तो अव्वल स्थानी कायम आहे. यंदा 54 सामन्यात फक्त दोनच पराभव त्याच्या नावावर आहेत.

फेडररचा मी मोठा प्रशंसक, त्याची कारकिर्द प्रेरणादायी- जोकोवीच

नदालचे वय सध्या 33 वर्षे असून तो टेनिस क्रमवारीच्या इतिहासातील सर्वाधिक वयाचा वर्षअखेरीचा नंबर वन खेळाडू आहे. नदाल यापूर्वि 2008, 2010, 2013 आणि 2017 मध्ये वर्षअखेरीस अव्वल स्थानी होता. पाच वेगवेगळ्या वर्षी वर्षअखेर नंबर वन राहणारा तो पहिलाच टेनिसपटू असून दोन वेळा इयर एण्डमध्ये सर्वाधिक कालावधीचा (2008 आणि 2019) चा विक्रमही नदालच्या नावावर लागला आहे.

टेनिस क्रमवारीत वर्षअखेर पाचपेक्षा अधिक वेळा नंबर वन राहिलेले खेळाडू

 • पीट सॅम्प्रास – 6- 1993 ते 1998
 • जिमी कॉनर्स- 5- 1974 ते 1978
 • रॉजर फेडरर- 5- 2004, 05, 06, 07, 09
 • नोव्हाक जोकोवीच- 5- 2011, 12, 14, 15, 18
 • राफैल नदाल- 5- 2008, 10, 13, 17, 19

गेल्या 16 वर्षांपासून वर्षअखेरीला फेडरर, नदाल, जोकोवीच व अँडी मरे या बिग फोरपैकी कुणी ना कुणी नंबर वन राहिलेला आहे.

असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स (एटीपी) ने 1973 पासून क्रमवारी सुरु केली.त्यात आतापर्यंत 17 खेळाडू वर्षअखेरीला नंबर वन राहिले आहेत.

एटीपी फायनल्स या वर्षातील शेवटच्या स्पर्धेत अव्वल खेळाडू निश्चित होण्याचे 2000 पासूनचे वर्ष असे..

 • 2000- गुस्ताव्हो कुएर्तेन
 • 2001 – लेटन हेविट
 • 2002- लेटन हेविट
 • 2003- अँडी रॉडिक
 • 2009- रॉजर फेडरर
 • 2013- राफेल नदाल
 • 2014- नोव्हाक जोकोवीच
 • 2016- अँडी मरे