नदाल 29 – 29 करणार का? की जोकोवीच इतिहास घडवेल?

novak djokovic and rafael nadal

अपेक्षेप्रमाणे फ्रेंच ओपनच्या (French Open) सेमी फायनलमध्ये (Semi final) नंबर वन नोव्हाक जोकोवीच (Novak Djokovic) आणि फ्रेंच ओपनचा बादशहा राफेल नदाल (Rafael Nadal) यांची लढत होणार आहे. या दोन खेळाडूंतील ही 58 वी लढत असून जोकोवीच 29-28 असा पुढे आहे पण फ्रेंच ओपनच्या क्ले कोर्टवर नदाल 7-1 असा पुढे आहे. गेल्यावर्षी त्याने जोकोला अंतिम सामन्यात सरळ सेटमध्ये पराभूत केले होते. त्यामुळे आता राफा 29-29 अशी बरोबरी साधेल याचीच दाट शक्यता आहे. टेनिसच्या खुल्या युगात म्हणजे 1968 नंतर कोणत्याही दोन खेळाडूंमध्ये एवढ्या लढती झालेल्या नाहीत.

क्वार्टरफायनलमध्ये नदालने अर्जेंटिनाच्या दिएगो श्वार्त्झमनवर तर जोकोवीचने इटलीच्या मॕटियो बेरैंटिनीवर प्रत्येकी चार सेटमध्ये विजय मिळवला. यामुळे गतवर्षीच्या अंतिम सामन्याचीच यंदा उपांत्य फेरीतच पुनरावृत्ती झाली. नदालने मागचे सलग 10 सामने जिंकले आहेत. त्यात रोम मास्टर्सचे विजेतेपद आहे.

जोकोसूध्दा फॉर्मात आहे. गेले सलग नऊ सामने त्याने जिंकले आहेत. त्यामुळे क्ले कोर्टवर नदालचे पारडे जड असले तरी जोको यावेळी तरी त्याला भारी पडेल का, याची उत्सुकता आहे. जोकोवीचला स्वतःला यावेळी चांगल्या कामगिरीची आशा आहे. तो म्हणतो की गेल्या महिनाभरापासून क्ले कोर्टवर माझी कामगिरी चांगली होत आहे. रोम आणि बेलग्रेडमधील स्पर्धा गाजवल्यानंतर आता रोलँड गॕरोसवर चांगली कामगिरी होत असल्याने मी उत्साहीत आहे.

नदालने गेल्या चार वर्षात श्वार्त्झमनविरूध्दच्या या स्पर्धेतील तिनही लढती जिंकल्या आहेत. या सर्व लढतीत त्याने नदालला झुंजवले होते आणि यावेळीसुध्दा एक सेट जिंकून त्याने 2019 नंतर प्रथमच नदालला फ्रेंच ओपनमध्ये सेट गमावण्यास भाग पाडले. सलग 36 सेट जिंकल्यावर नदालने सेट गमावला. पण शेवटचे ओळीने नऊ गेम जिंकून नदालने पुन्हा एकदा विजय मिळवला. आता फ्रेंच ओपनमध्ये नदालच्या नावावर 105 विजय आणि फक्त दोन पराभव आहेत.

टेनिसच्या खुल्या युगात दोन खेळाडूंदरम्यानच्या सर्वाधिक लढती (आघाडीवीर प्रथम)

जोकोवीच – नदाल (57) 29 – 28
जोकोवीच – फेडरर (50) 27 – 23
नदाल – फेडरर (40) 24 – 16
लेंडल – मॕकेन्रो (36) 21 – 15
जोकोवीच – मरे (36) 25 – 11

ग्रँडस्लॅम स्पर्धातील सर्वाधिक लढती

जोकोवीच – फेडरर (17) 11 – 6
नदाल – जोकोवीच (16) 10 – 6
नदाल – फेडरर (14) 10 – 4
जोकोवीच – मरे (10) 8 – 2
लेंडल – मॕकेन्रो (10) 7 – 3
फेडरर – बर्डिच (10) 8 – 2

फ्रेंच ओपनमधील सामने

नदाल – जोकोवीच (8) 7 – 1
नदाल – फेडरर (6) 6 – 0
लेंडल – विलँडर (4) 2 – 2

क्लै कोर्टवरील सर्वाधिक लढती

नदाल – जोकोवीच (26) 19 – 7
नदाल – फेरर (22) 20 – 2
नदाल – फेडरर (16) 14 – 2
विलास – डिब्ज (16) 13 – 3
विलास – हिगेरास (16) 12 – 4

जोकोवीच यंदा विजेता ठरला तर त्याच्या नावावर 19 वे ग्रँड स्लॅम विजेतेपद तर लागेलच शिवाय चारही ग्रँड स्लॅम स्पर्धा दोन,वेळा जिंकणारा तो,गेल्या 50 वर्षातील पहिलाच खेळाडू ठरेल. नदाल अंतिम विजेता ठरला तर 14 व्या फ्रेंच ओपन विजेतेपदासह त्याची 21 ग्रँड स्लॅम विजेतेपदं होतील आणि पुरुषांमध्ये सर्वाधिक स्लॕम विजेतेपदं त्याच्या नावावर लागतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button