नदालला आता लागलेत विवाहाचे वेध

Nadal set to marry Xisca Next month
  • 19 अॉक्टोबरला होणार विवाहबध्द
  • दीर्घकालीन मैत्रीण शिस्का पेरेलो बनणार जीवनसाथी
  • तीन मुलांचे कुटुंब बनविण्याची इच्छा

न्युयॉर्क : यूएस ओपनच्या विजेतेपदासह नंबर वनच्या दिशेने आगेकूच करत असलेला 33 वर्षीय स्पॕनिश टेनिसपटू राफेल नदालला आता चतुर्भूज होण्याचे वेध लागले आहेत. आपली दीर्घकाळापासूची 31 वर्षीय मैत्रीण मारिया फ्रान्सिस्का ‘शिस्का’ पेरेलो हिच्याशी तो 19 अॉक्टोबर रोजी विवाहबध्द होणार आहे.

या दोघांचे गेल्या 12 वर्षांपासून प्रेमप्रकरण आहे पण त्यांनी आता बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आहे. प्युर्टो पोलेन्सा नावाच्या ठिकाणी ते दोनाचे चार होणार आहेत. यामुळे तो आता शांघाय, बाझेल व पॕरिस येथील स्पर्धांत खेळताना दिसणार नाही पण लेव्हर कप आणि बीजिंगच्या स्पर्धेसह वर्षाअखेरीस एटीपी टूर फायनल्समध्ये तो खेळणार आहे. त्यामुळे वर्षअखेरीस नंबर वन स्थान गाठण्यासाठी नदालला सातत्याने चांगलीच कामगिरी करावी लागणार आहे.

नदालचे समकालीन आणि त्याच्यासारखेच सफल टेनिसपटू रॉजर फेडरर, नोव्हाक जोकोवीच व अँडी मरे हे तिघे विवाहबध्द झालेले असून पितासुध्दा बनले आहेत. मात्र आपण एवढे दिवस विवाहासाठी का थांबलो याबद्दल नदालने म्हटले आहे की, टेनिसशी आणि त्यातून मिळणाऱ्या आनंदाशी माझी बांधिलकी सर्वप्रथम आहे. मला खेळात आनंद मिळतो तसा खेळाच्या बाहेरही आनंद मिळतो आणि माझी गर्लफ्रेंडसुध्दा आहे आणि म्हणूनच माझे निर्णय घेणारा मी एकटाच नसतो. कुटुंब करण्यासाठी तुमची परिस्थिती अनुकूल असायला हवी. आता खरे तर माझे वय माजी टेनिसपटू म्हणण्यासारखे आणि कुटुंब बनविण्यासारखे आहे. कुटुंबासंदर्भात बोलताना यापूर्वीच त्याने इच्छा प्रदर्शित केलीय की त्याला तीन मुलांपर्यंतचे कुटुंब करायला आवडेल.

नदालची मैत्रिण शिस्का ही राफेल नदाल फाउंडेशनची संचालक असून ती या फाउंडेशनच्या समाजसेवी कार्याचे व्यवस्थापन बघते. याशिवाय समाजातील गरजू समुदाय व युवकांसाठी ती मदत करत असते.