नदाल आठव्यांदा बनलाय नंबर वन

Rafael Nadal

*जोकोवीच घसरला दुसऱ्या स्थानी
*लंडनची एटीपी फायनल्स स्पर्धा ठरवणार वर्षअखेरीचा नंबर वन
*जोकोवीचला साहाव्यांदा तर नदालला पाचव्यांदा इयर एंड नंबर वन ठरण्याची संधी
*दोघांत आहे फक्त 640 गुणांचे अंतर

नोव्हाक जोकोवीचने पाचव्यांदा पॕरिस मास्टर्स स्पर्धा जिंकली आणि राफेल नदालने प्रकृती बरी नसल्याने उपांत्य फेरीतच माघार घेतली तरी ताज्या जागतिक क्रमवारीत राफेल नदाल नंबर वन बनला आहे आणि जोकोवीच खाली घसरुन दुसऱ्या स्थानी आला आहे.मात्र या दोघांतील अंतर फक्त 640 गूणांचेच आहे. त्यामुळे वर्षाअखेरीला नंबर वन कोण असेल याची चुरस आता वर्षाच्या शेवटच्या स्पर्धेपर्यंत रंगली आहे.

वर्षाची शेवटची स्पर्धा निट्टो एटीपी फायनल्स लंडनमध्ये होणार असून त्यात विजेता ठरल्यास जोकोवीच नंबर वन आणि नदाल अंतिम फेरीपर्यंत पोहचला तर नदाल नंबर वन असे सध्या समीकरण आहे मात्र नदालची प्रकृती बरी नसल्याने तो एटीपी फायनल्स खेळेल का, याबद्दल प्रश्नचिन्ह आहे.

या समीकरणांतून जोकोवीच वर्षाअखेरीस नंबर वन राहिला तर कारकिर्दीत सहाव्यांदा तो वर्षाला नंबर वन म्हणून निरोप देईल आणि पीट सॕम्प्रासच्या विक्रमाची बरोबरी करेल. दुसरीकडे नदाल नंबर वन कायम राहिला तर तो पाचव्यांदा वर्षाला नंबर वन म्हणून बायबाय करेल आणि जिमी कॉनर्स, रॉजर फेडरर आणि नोव्हाक जोकोवीच यांच्या विक्रमाची बरोबरी करेल.

राफेल नदाल 8 आॕगस्ट 2008 रोजी पहिल्यांदा नंबर वन बनला होता आणि तेंव्हा तो सलग 46 आठवडे सर्वोच्च स्थानी होता. तेंव्हापासून आतापर्यत आठ वेळा तो सर्वोच्च स्थानी पोहचला आहे. नदाल केंव्हा केंव्हा नंबर वन होता ते पाहू या.

1) 8 आॕगस्ट 2008 पासून 46 आठवडे
2) 7 जून 2010 पासून 56 आठवडे
3) 7 आॕक्टोबर 2013 पासून 39 आठवडे
4) 21आॕगस्ट 2017 पासून 26 आठवडे
5) 2 एप्रिल 2018 पासून 6 आठवडे
6) 21 मे 2018 पासून 4 आठवडे
7) 25 जून 2018 पासून 19 आठवडे
8) 4 नोव्हेंबर 2019 पासून…..

फेडररला टाकले मागे

टेनिसच्या जागतिक क्रमवारीचे बरेच विक्रम रॉजर फेडररच्या नावावर आहेत. त्यापैकी एक आहे तब्बल 528 आठवडे पहिल्या दोन क्रमांकावर म्हणजे नंबर एक किंवा नंबर दोनवर राहण्याचा. एवढंच नाही तर नंबर एक व नंबर दोन या पदांवर प्रत्येकी दोनशेपेक्षा अधिक आठवडे राहणारा तो एकमेव खेळाडू आहे. मात्र आता यंदा 2002 नंतर पहिलेच असे वर्ष आहे की ज्यात फेडरर पहिल्या दोनमध्ये स्थान मिळवू शकलेला नाही. याचा फायदा फेडररच्या नजिकच्या स्पर्धकांना झालाय. त्यात त्याचा चांगला मित्र स्पेनचा राफेल नदाल आहे.

आता राफेल नदाल हा जागतिक टेनिस क्रमवारीत पहिल्या व दुसऱ्या स्थानी मिळून 529 आठवडे राहिलेला पहिला खेळाडू ठरला आहे आणि त्याने फेडररलाही मागे टाकले आहे.

जागतिक क्रमवारीत नदाल 2005 मध्ये पहिल्यांदा दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला होता. त्यावर्षी त्याने 11 एटीपी विजेतेपदं पटकावून फेडररला मोठे आव्हान निर्माण केले होते.

2007 पर्यंत त्याने नंबर दोनवरील शंभर आठवड्यांचा टप्पा पार केलेला होता आणि 2008 मध्ये तो पहिल्यांदा नंबर वन बनला होता. तेंव्हापासून आता तो आठव्यांदा नंबर वन बनला आहे आणि एप्रिल 2005 पासुन तो एकदाही टॉप टेनच्या बाहेर गेलेला नाही.