राफेल नदाल झाला चतुर्भूज

Rafael Nadal

14 वर्षांपासूनची मैत्रिण झिस्का पेरेलोसोबत बांधली लग्नाची गाठ ,स्पेनच्या राजांसह मोजक्या 350 जणांची उपस्थिती रॉजर फेडररसारख्या मित्राला मात्र नव्हते निमंत्रण.

जगातील आघाडीचा स्पॕनिश टेनिसपटू राफेल नदाल हा मोजक्या 350 पाहूण्यांच्या उपस्थितीत शनिवारी आपली मैत्रिण झिस्का पेरेलो हिच्याशी विवाहबध्द झाला. या दोघांमधील 14 वर्षांच्या मैत्रीचे मालोर्का येथे एका सुंदर नात्यात रुपांतर झाले. मालोर्का येथील किल्ल्यात हा शानदार विवाहसोहळा पार पडला. स्पेनचे 2014 पर्यंतचे राजे युआन कार्लोस (प्रथम) यांची उपस्थिती या सोहळ्याला होती अशी चर्चा आहे. नदाल हा 33 वर्षांचा असून झिस्का ही 31 वर्षांची आहे. या दोघांची गेल्या 14 वर्षांची मैत्री ही नदालची धाकटी बहिण मारिबेल हिच्यामुळे आहे. झिस्का व मारिबेल या बालपणापासूनच्या मैत्रिणी आहेत.

नदालच्या या विवाहसोहळ्याला उपस्थित साडेतिनशे जणांमध्ये नेमका त्याचा मित्र रॉजर फेडरर नव्हता याबद्दल मात्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आपल्याला नदालचा विवाह कधी आहे हेसुध्दा माहित नव्हते असे फेडररने गेल्या महिन्यात म्हटले होते. नदाल व फेडरर हे टेनिस कोर्टवर प्रतिस्पर्धी असले तरी मैदानाबाहेर ते अतिशय चांगले मित्र आहेत. विशेष करुन लेव्हर कप स्पर्धेत त्यांची मैत्री बघण्यासारखी आहे. मात्र या विवाह सोहळ्याला फेडररला निमंत्रण नव्हते अशी माहिती समोर आली आहे.