नदाल क्ले कोर्टवरील पकड गमावतोय का?

लागोपाठ दुसऱ्या स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभव

Rafael Nadal

बार्सिलोना :- स्पॕनिश टेनिसपटू राफेल नदाल याला क्ले कोर्टचा बादशहा समजले जाते. क्ले कोर्टवरील माँटे कार्लो ओपन, बार्सिलोना ओपन आणि फ्रेंच ओपन या तीन प्रमुख स्पर्धा त्याने थोडथोडक्या नव्हे तर प्रत्येकी 11 वेळा जिंकल्या आहेत परंतु, यंदा मात्र ‘राफा’ ने क्ले कोर्टवरील पकड गमावलीय की काय असे वाटावे अशी स्थिती आहे. यंदा माँटे कार्लो आणि आपल्या घरच्या बार्सिलोना ओपन, या लागोपाठ दोन स्पर्धात त्याचे आव्हान उपांत्य फेरीतच संपले आहे.

माँटे कार्लो स्पर्धेत फॕबियो फॉग्निनी याने ‘राफा’ला 6-4, 6-2 असे पराभूत केले तर बार्सिलोना ओपनमध्ये अॉस्ट्रियाच्या डॉमिनिक थीएमने राफाचे आव्हान 6-4, 6-4 असे संपवले. 11-11 वेळा जिंकलेल्या या स्पर्धांमधील नदालचे हे पराभव अनपेक्षित तर होतेच, मात्र त्याचे दोन्ही ठिकाणी सरळ सेटमध्ये पराभूत होणे अधिक धक्कादायक होते.

सद्यस्थितीत राफानंतर थिएम हा क्ले कोर्टवरील उत्कृष्ट खेळाडू म्हणून समोर येत आहे कारण गेल्या चार वर्षात आपल्या 12 पैकी 8 विजेतेपद त्याने याप्रकारच्या मैदानांवर कमावली आहेत.

2005 मध्ये नदालने पहिल्यांदा माँटे कार्लो, बार्सिलोना आणि फ्रेंच ओपन या तिन्ही स्पर्धा पहिल्यांदा जिंकल्या होत्या. तेंव्हापासून आता केवळ दुसऱ्यांदा यंदाच्या फ्रेंच ओपनमध्ये नदाल हा माँटे कार्लो व बार्सिलोनाच्या विजेतेपदाशिवाय उतरेल.

फॉग्निनीविरूध्दच्या पराभवाचे नदालने स्वतःच आपला गेल्या 14 वर्षातील क्ले कोर्टवरचा खराब सामना असे वर्णन केले आहे. या सामन्याच्या पहिल्या सेटमध्ये 3-1 आघाडीवर असताना नदालने पुढच्या 14 पैकी 11 गेम गमावले होते. त्यानंतर 19 वर्षांच्या कारकिर्दीत नदाल पहिल्यांदाच क्ले कोर्टवर लागोपाठ दोन सामने गमावण्याच्या मार्गावर होता. अर्जेंटिनाच्या लिओनार्दो मेयरने बार्सिलोना ओपनच्या सामन्यात त्याला तीन सेटपर्यंत खेचले होते. त्यामुळे आता फ्रेंच ओपनमध्ये नदाल बाराव्यांदा जिंकणार का, याबद्दल शंकाच आहे कारण गेल्या वर्षभरापासून नोव्हाक जोकोवीच भन्नाट फॉर्ममध्ये आहे आणि त्याचा अडसर राफाला दूर करावा लागणार आहे. याशिवाय डॉमिनिक थिएमचे आव्हानसुध्दा आहे. लागोपाठ चौथ्या मोसमात थिएमने क्ले कोर्टवर नदालला मात दिली आहे. क्ले कोर्टवर नदालला चारपेक्षा अधिक वेळा मात देणारा तो केवळ दुसराच खेळाडू आहे. आता राफावरील 7 विजयांसह केवळ जोकोवीच हाच त्याच्या पुढे आहे. 2017 व 2018 च्या मोसमातही क्ले कोर्टवर नदालला मात देणारा थिएम हाच एकमेव खैळाडू होता.

यंदाच्या बार्सिलोना ओपनच्या उपांत्य फेरीतील पराभव हा नदालचा त्याच्या या घरच्या स्पर्धेतील उपांत्य वा अंतिम सामन्यातील पहिलाच पराभव होता. या पराभवाआधी त्याने बार्सिलोना येथे सलग 22 सामने उपांत्य वा अंतिम फेरीत जिंकले होते.