नदाल आतापर्यंत हुकलेल्या विजेतेपदाच्या आणखी एक पाऊल जवळ

rafel Nadal

लंडन : स्पेनचा राफेल नदाल (Rafael Nadal) जी स्पर्धा आतापर्यंत जिंकू शकलेला नाही त्या निट्टो एटीपी फायनल्सच्या (ATP Finals) विजेतेपदाकडे त्याने आणखी एक पाऊल टाकले आहे. विद्यमान विजेता ग्रीसचा स्टेफानोस सीसीपास (Stefanos Tsitsipas) याला 6-4, 4-6, 6-2 अशी मात देत त्याने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आता अंतिम फेरी गाठण्यासाठी त्याला दानिल मेद्वेदेव्हला मात द्यावी लागेल.

20 ग्रँड स्लॕम विजेतेपदं नावावर लावलेला नदाल आतापर्यंत एकदासुध्दा ही स्पर्धा जिंकू शकलेला नसला तरी सहाव्यांदा उपांत्य फेरीत पोहोचला आहे.

या पराभवानंतर सिसीपास म्हणाला की, तिसऱ्या सेटमध्ये माझी कामगिरी खराब झाली. मी धावपळ करत होतो पण खरं सांगायचं तर मी काय करतोय तेच मला कळत नव्हतं. मी जरा जास्तच आक्रमक खेळत होतो पण मी गरजेनुसार खेळत नव्हतो.

नदालने हा सामना गमावला असता तर या स्पर्धेतून त्याचे आव्हान संपले असते. आता त्याने पुढे आगेकूच करताना गतविजेता सीसीपासला बाद केले आहे. त्याच्या गटात डॉमिनीक थीमनंतर तो आता दुसऱ्या स्थानी आहे.

वर्षाअखेरच्या शेवटच्या स्पर्धेत अंतिम चौघात येणे ही फार महत्त्वाची गोष्टआहे आणि त्याचा मला आनंद आहे असे नदालने म्हटलेले आहे.

गेल्यावर्षी याच स्पर्धेच्या शेवटच्या साखळी सामन्यात सिसीपासला दोन तास 52 मिनीटे झुंजवूनसुध्दा तो हरल्याने बाद झाला होता. यावेळी दोन तास पाच मिनीटात राफा सरस ठरला आणि सिसीपासविरुध्द त्याने आपली कामगिरी 6 विजय एक पराभव अशी सुधारली.

तो म्हणतो की यंदासारखेच गेल्यावर्षीसुध्दा मी दोन सामने जिंकले होते पण त्यावेळी मी कमनशीबी ठरलो होतो. त्याच्या आदल्या वर्षी मी स्पर्धाच पूर्ण करु शकलो नव्हतो. वर्षाअखेरच्या या स्पर्धेत वर्षभरातील सर्वोत्तम आठ खेळाडू असतात आणि त्यांच्याशी लढताना दररोज चांगली कामगिरी करत राहणे सोपे नसते. बऱ्याचदा थकायला होते पण आता यंदा चांगली कामगिरी करण्यास मी उत्सुक आहे.

नदाल सर्वाधिक 16 वेळा या वर्षअखेरच्या स्पर्धेला पात्र ठरला आहे. 2005 पासुन यंदापर्यंत दरवर्षी तो या स्पर्धेत खेळतोय पण विजेतेपदाने त्याला हुलकावणीच दिली आहे.

सिसीपासने त्याचे पहिले नऊ सार्व्हिस गेम एकही गूण न गमावता जिंकले पण राफाने रॕलीज व त्याच्या बॕकहँडवर आक्रमण करुन वर्चस्व मिळवले. नंतर मात्र सर्व्हिस गेमचे चित्र बदलले आणि तिसऱ्या सेटमध्ये लागोपाठ तीन सर्व्हिस ब्रेक बघायला मिळाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER