दमदार प्रतिस्पर्ध्याकडून हरलो : राफेल नदाल

डॉमिनिक थिमचे केले कौतुक

मेलबोर्न :- आस्ट्रियाच्या डॉमिनिक थिम याने अग्रमानांकित आणि नंबर वन राफेल नदाल याचे यंदाच्या आस्ट्रेलियन ओपनमधून आव्हान संपवले. तब्बल चार तास १० मिनिटे रंगलेल्या उपांत्यपूर्व सामन्यात त्याने पोलादी संयम आणि जबरदस्त चिकाटी दाखवत 7-6 (7/3), 7-6 (7/4), 4-6, 7-6 (8/6) असा विजय मिळवला. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत नदाल पहिल्यांदाच एखाद्या सामन्यात तीन-तीन टायब्रेकर हरला तर पाचवा मानांकित थीम प्रथमच आस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यफेरीत पोहोचला आहे. त्याचा सामना आता अ‍ॅलेक्झांडर झ्वेरेवशी होणार आहे.

या सामन्यात पराभव पत्करावा लागला असला तरी नदालने नव्या दमाच्या थीमचे कौतुक केले आहे. त्याच्या कौतुकात नदाल म्हणाला की, एका दमदार प्रतिस्पर्ध्याकडून मी हरलो. पराभवाचे दु:ख आहेच पण्ण विजयाचे श्रेय खरोखर थीमच्या उमद्या खेळालाच आहे. अणाखी एका ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीची संधी हुकल्याचे दु:ख आहेच पण थीम खरोखरच चांगला खेळला.

दरम्यान आस्ट्रेलियन ओपन ही नदालची अपयशीे स्पर्धा असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले. फ्रेंच ओपन तब्बल १२ वेळा जिंकलेला हा खेळाडू आस्ट्रेलियन ओपन मात्र आतापर्यंत त्याने फक्त एकदाच (२००९) जिंकू शकला आहे. विशेष म्हणजे याच डॉमिनिक थीमला गेल्या दोन फ्रेंच ओपनच्या अंतिम सामन्यात तो मात देत आला आहे पण आस्ट्रेलियन ओपनच्या हार्डकोर्टवर थीम त्याला भारी पडला. थीम २६ वर्षांचा असून या वयाच्या फरकाचाही त्याला फायदा झाल्याचे नदालने म्हटले आहे.काही वेळा मला अधिक निर्धारी व निश्चयी खेळाची गरज आहे हे खरे आहे हा आपला कमकुवत दुवा नदालने मान्य केला.

नव्या चेंडूसह माझ्याकडे दोन ब्रेकच्या संधी होत्या. नव्या चेंडूसह खेळायला मला तुलनेत सोपे जाते. पण थीम तरुण आहे आणि चपळ आहे. म्हणून चेंडू वजनदार झाल्यावर तो प्रभावी फटके मारू शकला जे मला जमले नाही. आपण एखादा टाय ब्रेक जिंकू शकलो असतो एवढाच एक बदल या सामन्याच्या निकालात करू शकत होतो अशी कबुली त्याने दिली. आपला प्रतिस्पर्धी अधिक उर्जावान, आक्रमक आणि निर्धारी होता हे मान्य करावेच लागेल असे नदालने म्हटले आहे.