फ्रेंच ओपनमध्ये वेगळ्या वातावरणात नदालचा मार्ग खडतर

Rafael Nadal

राफेल नदालने (Rafael Nadal) डझनभर वेळा फ्रेंच ओपनच्या (French Open Tennis) विजेतेपदाची ट्राॕफी उंचावली आहे. क्ले कोर्टचा तो बादशहा मानला जातो तरी त्याला यंदाच्या फ्रेंच ओपनसाठी फेव्हरिट म्हणता येईल का? हा प्रश्न पडायचे कारण म्हणजे एकतर यंदा फेब्रुवारीपासून तो एकच स्पर्धा खेळला आहे आणि त्यातही उपांत्यपूर्व फेरीतच त्याला पराभव पत्करावा लागला आहे.

दुसरीकडे त्याचा स्पर्धक नोव्हाक जोकोवीच (Novak Djokovic) हा यंदा 31-1 असा यशोलाटेवर आरुढ आहे.गेल्याच आठवड्यात रोम येथील स्पर्धा जिंकून त्याने एटीपी मास्टर्स विजेतेपदांमध्ये फेडरर व नदालला मागे टाकले आहे. आणि नदालच्या तुलनेत त्याला तसा सोपा ड्रॉ मिळाला आहे.

नदालच्या मार्गात उपांत्य फेरीत यंदाचा यूएस ओपन विजेता डॉमिनीक थिम येऊ शकतो आणि त्याच्यावर मात केली तर त्याला जोकोवीचचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे आपला 20 व्या ग्रँड स्लॕम अजिंक्यपदाचा मार्ग सोपा नाही याची त्याला जाणिव आहे.

अलीकडेच जोकोवीच म्हणाला होता की नदाल हा काही क्ले कोर्टवर अपराजेय नाही. त्याच्या प्रतिसादात नदालने म्हटलेय की हो, हे खरे आहे. क्ले कोर्टवर मी हरू शकतो. नोव्हाकनेच किती वेळा मला पराभूत केलेय. परंतु हे सुध्दा खरे आहे की क्ले कोर्टवरच मी खूप सारे यशसुध्दा मिळवले आहे. यंदाची परिस्थिती तर वेगळीच आहे. चेंडू पूर्णपणे वेगळा, जड आणि संथ आहे. आमची तयारीसुध्दा कमी आहे.पण मी येथे लढण्यासाठी आलोय,आणि मी माझ्या परीने पूर्ण ताकदीने खेळणार. सरावही त्याच विचाराने करणार जेणेकरुन मला संधी निर्माण करता येईल. माझे ध्येयच ते आहे. लढत रहायचे आणि दिवसागणिक परिस्थिती बघत रहायची. रोलँड गॕरोची मला चांगली माहिती आहे. येथे संयम लागतो व सकारात्मकता लागते.

यंदा ही स्पर्धा जिंकला तर नदाल हा राॕजर फेडररच्या 20 व्या ग्रँड स्लॕम अजिंक्यपदाचा विक्रम गाठेल आणि या स्पर्धेतील विजयांचे त्याचे शतकही पूर्ण होईल.सध्या या स्पर्धेत 95 सामन्यांतून त्याचे 93 विजय आहेत. त्याचा पहिल्या फेरीचा सामना इगोर गेरासिमोव्ह याच्याशी आहे.,

दरवर्षी मे मध्ये होणारी ही स्पर्धा कोरोनाच्या साथीमुळे यंदा सप्टेंबरच्या शेवटी होत आहे. या काळात पॕरिसमधील वातावरण थंड असते आणि त्याचा खेळावर परिणाम होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER