1999 नंतर टेनिसमध्ये असे प्रथमच घडतेय..

Roger Federer - Rafael Nadal

विद्यमान विजेत्या राफेल नदालने(Rafael Nadal) कोरोनाच्या(Coronavirus) साथीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या युएस ओपन टेनिस स्पर्धेत सहभागी होण्याचे टाळले आहे. 31 ऑगस्टपासून ही स्पर्धा न्यूयॉर्कमध्ये खेळली जाणार आहे परंतु सध्या न्यूयॉर्क हे कोरोनाचे हॉटस्पॉट झाले आहे. नदालने गेल्यावर्षी दानिल मेद्वेदेवला पाच सेटमध्ये मात देत ही स्पर्धा जिंकली होती.

नदालशिवाय महिलांमधील नंबर वन खेळाडू ऍशली बार्टी आणि ऑस्ट्रेलियाचा निक किरयोस या आघाडीच्या खेळाडूंनीही युएस ओपनमधून माघार घेतली आहे.

नदाल या स्पर्धेत खेळेल का, याबद्दल सुरुवातीपासूनच शंका होती कारण युएस ओपन खेळण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे असे वाटले तरच आपण या स्पर्धेत खेळू असे त्याने जूनमध्येच स्पष्ट केले होते. शिवाय यूएस ओपननंतर लगेचच नदालची सर्वात आवडती स्पर्धा, फ्रेंच ओपन खेळली जाणार आहे. क्ले कोर्टचा बादशहा मानला जाणारा नदालने तब्बल 12 वेळा ही स्पर्धा जिंकली असून तो या स्पर्धेचा सम्राट मानला जातो. त्यामुळे तो फ्रेंच ओपनला फाटा देईल अशी शक्यता कमीच आहे. शिवाय तीन आठवड्यात दोन ग्रँड स्लॅम स्पर्धा खेळणे आणि यूएस ओपनच्या हार्डकोर्टवरुन लगेच क्ले कोर्टच्या स्पर्धा खेळणे कोणत्याही टेनिसपटूसाठी फारच अवघड आहे म्हणून नदाल यंदा युएस ओपनऐवजी फ्रेंच ओपनला प्राधान्य देईल हे उघडच होते.

दुसरीकडे नदालचा मित्र व प्रतिस्पर्धी रॉजर फेडरर(Roger Federer) हासुध्दा गुडघ्याच्या शस्रक्रियेमुळे यंदाच्या यूएस ओपनमध्ये खेळणार नाही. त्यामुळे 1999 नंतरची ही पहिलीच अशी यूएस ओपन असेल ज्यात नदाल व फेडरर हे दोघे नसतील. नंबर वन नोव्हाक जोकोवीच मात्र खेळणार आहे आणि या दोघांच्या गैरहजेरीत त्याला ही स्पर्धा जिंकण्याची नामी संधी असेल. तसे झाल्यास जोकोवीचचे हे 18 वे ग्रँड स्लॅम विजेतेपद असेल आणि 20 विजेतेपदे असणारा फेडरर आणि 19 विजेतेपदांचा धनी राफेल नदाल यांच्या तो आणखी जवळ पोहोचेल.

जोकौवीचला तिसऱ्या क्रमांकाचा डॉमिनिक थिऐम, पाचव्या क्रमांकाचा दानिल मेद्वेदेव आणि सहाव्या क्रमांकाचा स्टिफानोस सिसीपास यांच्याकडून आव्हान मिळण्याची शक्यता आहे.

नदालने आपल्या माघारीचे कारण देताना म्हटलेय की मी खूप विचार करून हा निर्णय घेतला आहे. जगभर कोविड- 19 मुळे परिस्थिती खूप चिंताजनक आहे. रुग्ण वाढत आहेत आणि आपल्याला अजुनही या साथीवर नियंत्रण मिळवता आलेले नाही. यामूळे फार कमी कालावधीत टेनिसच्या बऱ्याच स्पर्धा खेळल्या जाणार आहेत. चार महिन्यांच्या खंडानंतर असे घडणे अपेक्षितच होते. त्यामुळे अशा परिस्थितीतही स्पर्धा आयोजनाचे प्रयत्न होताहेत हे कौतुकास्पदच आहे . यासाठी युएसटीए व एटीपीचेही यूएस ओपन होणार असल्याबद्दल आभारच मानायला हवेत, परंतु यावेळी मी माझ्या मनाचे ऐकायचा निर्णय घेतला आहे आणि प्रवास न करण्याचा निर्णय नाखूशीनेच घेतला आहे असे नदालने म्हटले आहे.

महिला गटात मात्र नंबर वन ऍशली बार्टी वगळता टॉप 10 मधील इतर नऊ खेळाडू सहभागी होणार आहेत . त्यात दुसऱ्या क्रमांकाची सिमोना हालेप ही आघाडीची खेळाडू आहे. सेरेना विल्यम्सही सातव्या युएस ओपन आणि एकूण 24 व्या ग्रँड स्लॅम विजेतेपदासाठी मैदानात उतरणार आहे.

नदाल व फेडररशिवाय पुरुषांमध्ये गेल मोन्फिल्स (क्र.9), फोबिओ फागनिनी (11), स्टोन वावरिंका (17), निक किरयोस (40), जो विल्फ्रेड त्सोंगा (49) हे टॉप 50 मधील खेळाडू यंदा यूएस ओपनमध्ये नसतील. यामुळे 2004 च्या विम्बल्डननंतर ही पहिलीच अशी स्पर्धा असेल ज्यात नदाल- फेडरर- जोकोवीचपैकी एकच खेळाडू असेल. यामुळे यंदाच्या 32 मानांकित खेळाडूंमध्ये एकच ग्रँड स्लॅमविजेता पुरुष खेळाडू असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER