राॕजर्स कपच्या विजेतेपदात नदालचा विक्रमांचा धडाका

Rafael Nadal

टोरांटो (कॕनडा): स्पेनचा राफेल नदाल हा दोन वेगवेगळ्या पृष्ठभागाच्या मैदानांवर मास्टर्स दर्जाच्या स्पर्धांची प्रत्येकी 10 विजेतेपद पटकावणारा पहिला टेनिसपटू ठरला आहे. रॉजर्स कप स्पर्धेच्या विजेतेपदासह त्याने हा विक्रम केला.

अवघ्या 70 मिनिटात त्याने दानिल मेद्वेदेवचा 6-3, 6-0असा पराभव केला. यासह अग्रमानांकित नदालने हार्ड कोर्टवरील या स्पर्धेचे विजेतेपद स्वतःकडेच कायम राखले. त्याचे हे पाचवे कॕनेडियन विजेतेपद असून कारकिर्दीत पहिल्यांदाच त्याने क्ले कोर्टशिवाय इतर स्पर्धेचे विजेतेपद कायम राखले आहे. गेल्यावर्षी त्याने सीसीपासला मात देत या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.

असोसिएशन अॉफ टेनिस प्रोफेशनल्सच्या स्पर्धांमध्ये (एटीपी) ग्रँड स्लॕम व एटीपी फायनल्सनंतर मास्टर्स ह्या स्पर्धा महत्त्वाच्या असतात. यातील विजेतेपदासाठी खेळाडूंना एक हजार एटीपी गूण मिळतात. अशा महत्त्वाच्या मास्टर्स स्पर्धेचे नदालचे हे 35 वे विजेतेपद आहे. आता मास्टर्स 1000 स्पर्धेची सर्वाधिक विजेतेपद नदालच्या नावावर असून त्यानंतर जोकोवीचची 33 विजेतेपद आहेत.

उपांत्य फेरीच्या सामन्यात गेल मोनफिल्सने शनिवारी टाचदुखीमुळे माघार घेतल्याने नदालला अंतिम सामन्याआधी चांगली विश्रांती मिळाली होती. त्यामुळे ताज्यातवान्या स्थितीत खेळताना त्याने मेद्वेदेवचा धुव्वा उडवला. या दोघांदरम्यानची ही पहिलीच लढत होती.

या विजेतेपदादरम्यान नदालने केलेले विक्रम..

  • 1) कॕनेडियन ओपन (रॉजर्स कप) चे पाचवे विजेतेपद
  • 2) क्ले कोर्टशिवाय इतर पृष्ठभागावरील स्पर्धेचे पहिल्यांदाच लागोपाठ दुसरे विजेतेपद
  • 3) दोन वेगवेगळ्या पृष्ठभागावरील (हार्ड कोर्ट व क्ले कोर्ट) प्रत्येकी 10 मास्टर्स स्पर्धा जिंकणारा पहिला टेनिसपटू
  • 4) 35 वे एटीपी मास्टर्स विजेतेपद. सर्वाधिक मास्टर्स विजेतेपद. जोकोवीच (33) व फेडररची 28 मास्टर्स विजेतेपदे.
  • 5) मास्टर्स 1000 दर्जाच्या स्पर्धेचे सर्वाधिक 51 अंतिम सामने. फेडररचे 50 व जोकोवीचचे 49 अंतिम सामने