नदाल तब्बल 16 वर्षानंतरही क्रमवारीत दुसऱ्या स्थानी

Rafael Nadal

टेनिससारख्या (Tennis) अतिशय स्पर्धात्मक वैयक्तिक खेळामध्ये कारकिर्द फार मोठी नसते. साधारण दहा-बारा वर्षात खेळाडू उतरणीला लागतात पण काही खेळाडू याला अपवाद आहेत. राफेल नदाल (Rafael Nadal) हा असाच एक खेळाडू. नदालची कारकिर्द किती मोठी आहे हे सांगण्याची गरज नाही पण आता या प्रदीर्घ कारकार्दीतही त्याने किती सातत्य राखलंय हे आता एका विक्रमातून समोर आलंय.

सध्या तो 20 ग्रँड स्लॅम अजिंक्यपदांसह रॉजर फेडररच्या (Roger Federer) बरोबरीवर आहे पण सातत्याच्या बाबतीत त्याने आता रॉजर फेडररलासुध्दा मागे टाकलंय. तो जागतिक क्रमवारीत 2005 मध्ये दुसऱ्या स्थानी होता आणि आता 2020 मध्येही तो दुसऱ्याच स्थानी आहे.मध्यंतरी हा क्रम खालीवर झाला पण तब्बल 16 वर्षानंतरही आपण क्रमवारीत दुसरे स्थान कमावण्यासारखा खेळ त्याने कायम राखला आहे आणि कामगिरीत सातत्य असेल तरच क्रमवारीतील स्थान कायम राहत असते हे सर्वांनाच ठाऊक आहे.

याबाबतीत 16 वर्षांच्या सातत्यासह राफेल नदाल आता जगात नंबर वन असून त्याने रॉजर फेडररचा 15 वर्षांचा विक्रम मागे टाकला आहे. राॕजर फेडरर 2003 मध्ये नंबर दोन होता आणि 2017 मध्येही वर्षअखेर नंबर दोन होता. असा 15 वर्षांचा त्याचा विक्रम होता जो नदालने आता मागे टाकला.

टेनीसमध्ये एटीपीने 1973 मध्ये क्रमवारी सुरु केली. तेंव्हापासून आतापर्यंत केवळ 17 खेळाडूच वर्षअखेर नंबर दोन राहिले आहेत. त्यापैकी नऊ जणांनी किमान सहा वर्षांच्या अंतरात नंबर दोन स्थान कायम राखले आहे. पीट सम्प्रास, स्टिफन एडबर्ग आणि जॉन मॕकेन्रो हे सहा वर्षांच्या अंतरातही दुसऱ्या स्थानी होते. इव्हान लेंडल हा 1983 नंतर 1989 मध्येही वर्षअखेरीस नंबर दोन होता.म्हणजे सात वर्ष त्याने आपले सातत्य टिकवुन ठेवले होते. आंद्रे अगासी 1994 व 2002 असा नऊ वर्षे, नोव्हाक जोकोवीच हा 2011 व 2020 अशी 10 वर्षे, जिमी कॉनर्स हे 1974 व 1984 अशी 11 वर्षे नंबर दोन स्थानी पोहोचलेले होते. त्यांच्यापुढे रॉजर फेडरर व राफेल नदाल आहेत.

सध्या 34 वर्षांचा असलेल्या नदालने 2005 मध्ये 11 विजेतेपद व 79 विजयांची कामगिरी नोंदवली होती आणि रॉजर फेडररचा स्पर्धक म्हणून तो समोर आला होता. आता यंदा वयाच्या 34 व्या वर्षि त्याने फ्रेंच ओपन जिंकण्यासोबतच एटीपीच्या आणखी दोन स्पर्धा जिंकल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER