महिला दिनानिमित्त गर्दी जमविण्यासाठी भेटवस्तूचे आमिष दाखविणे सत्ताधारी भाजपाच्या अंगलट

मीरा रोड/ ठाणे : मीरा भाईंदर महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीतर्फे आयोजित महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी गर्दी जमविण्यासाठी महिलांना चक्क नाश्ता, भेटवस्तूंचे आमिष दाखवून बोलाविण्याचा प्रकार सत्ताधारी भाजपाच्या अंगलट आला. आपल्या लहान बाळासह तीन-तीन तास ताटकळलेल्या अनेक महिलांना भेटवस्तू तर दूरच साधे पाणी देखील मिळाले नाही. गोंधळात महिलांशी धक्काबुक्की करण्यात आली, हे सर्व घडक असताना पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली.

पालिकेच्या पत्रिकेत व बॅनरवर शिवसेना खासदार राजन विचारेंना बाजूला सारले. भाजपाच्या महापौर गीता जैन यांनीच आयुक्तांना पत्र देउन निमंत्रण पत्रिकेत शिष्टाचार पाळला नाही म्हणुन बेजबाबदार अधिकारयांवर कारवाईची मागणी केली . बॅनरवर समितीच्या ६ महिला नगरसेविकांची छायाचित्रे डावलण्यात आली. आमदार सरनाईक यांनाही निमंत्रण देण्यात आले नाही. अगदी स्थळ ठरवण्यापासुन सर्व कार्यक्रमावर भाजपाच्या एका पुरुष नेत्याचीच लुडबुडची चर्चा रंगली होती.

भाजपाकडुन चक्क सदर पालिका कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका पक्षाच्या नावे छापण्यात आल्या. गिफ्ट कुपन परस्पर छापुन भाजपाच्या नगरसेविका, पदाधिकारी आदींना वितरीत करण्यात आले. त्यांच्या मध्यमातून ती कुपन महिलांना देण्यात आली होती. यामुळे कार्यक्रम पालिकेचा का भाजपाचा ? असा सवाल केला जाऊ लागला.

शिवसेनेने तर मंगळवारी आयुक्त डॉ. नरेश गीते यांची भेट घेऊन तक्रार केली. पण आयुक्तांनी काहीच कार्यवाही न केल्याने आज बुधवारी शिवसेनेने आयुक्त दालना बाहेर काळे झेंडे व निषेधाचे फलक दाखवत संताप व्यक्त केला. परंतु आयुक्तांसह उपायुक्त आदी कोणीच दालनात नसल्याने शिवसैनिकांनी विभागाचे अधिकारी दामोदर संखे व गोविंद परब यांना घेराव घालुन जाब विचारला. तोच उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे दालनात आल्याचे कळताच मोर्चा त्यांच्या दालनाकडे वळला.

पालिकेतुन शिवसैनिकांचे आदोलन थेट मैदानावर आले. मैदाना बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. या वेळी पोलिसांनी शिवससेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कारवाईचा इशारा दिल्याने ते सर्व संतप्त झाले. कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेल्या महिलांनी तर आक्रमक पावित्रा घेतला. अनेकजण संतप्त होऊन नाराजी व्यक्त करत होते. विशेष म्हणजे पालिकेच्या आयुक्तांपासून एकही उपायुक्त पालिकेचा कार्यक्रम असून देखील उपस्थित नव्हता.