होऊनही `न झालेल्या` पहिल्या लग्नाचे गूढ!   

होऊनही `न झालेल्या` पहिल्या लग्नाचे गूढ!   

Ajit Gogateगेल्या आठ-पंधरा दिवसांत मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) काय निकाल झाले याचा न्यायालयाच्या वेबसाइटर धांंडोळा घेत असता एका निकालपत्राने लक्ष वेधून घेतले. ते निकालपत्र वाचल्यावर एखादी सहस्यकथा वाचल्याचा अनुभव आला. त्यात पुण्यातील एका इसमाच्या २५ वर्षांपूर्वी प्रत्यक्षात होऊनही कायद्याच्या दृष्टीने ‘न झालेल्या’ पहिल्या लग्नाचे गूढ कथानक होते. पहिली पत्नी हयात असूनही फसवून दुसरे लग्न केलेला कथानायक खटल्यातून निर्दोष सुटण्याने या कथानकाचा शेवट होतो.

या कथानकात दोन समांतर शक्यता तुल्यबळ संभाव्यतेने दिसतात. एक म्हणजे, दुसरे लग्न करण्याआधी या इसमाचे खरंच पहिले लग्न झाले होते. पण त्याच्या त्या पहिल्या बायकोने कथानकातून अर्ध्यातूनच ‘एक्झिट’ घेतल्याने ते पहिले लग़्न झाल्याचे सिद्ध होऊ शकत नाही. दुसरी शक्यता अशी: झालेल्या लग्नात दुसर्‍याच दिवशी बिब्बा घालण्यासाठी पहिल्या लग्नाचे कुभांड रचले गेले व पहिल्या पत्नीच्या रूपाने एक ‘तोतया’ उभा केला गेला. खरे खोटे काहीही असो. पण लग्नासारखे पवित्र व विश्वासाचे नाते जोडताना लोक कपटाने कोणत्या थरापर्यंत जाऊ शकतात, हे वाचून मन विषण्ण झाले.

आता हे कथानक थोडक्यात पाहू. प्रकाश मिरकुटे व स्वप्नाली पांगम या दोघांचे पुण्यात वानवडी येथे १९ ऑक्टोबर १९९५ रोजी लग्न झाले. दुसºया दिवशी देवदर्शनाला जाऊन नवदाम्पत्य संध्याकाळी घरी येते. घरात दोन्ही कडचे पाहुणे असतात. सत्यनारायणाची पूजा होते. रात्री आठच्या सुमारास स्वत:चे नाव  ‘प्रभावती मिरकुटे’ असे सांगणारी एक स्त्री येते. ‘मी प्रकाशची पहिली बायको आहे. त्याच्यापासून मला दोन मुले झाली आहेत. मला फसवून त्याने हे दुसरे लग्न केले आहे’, असा बॉम्बगोळा ती टाकते व आत्महत्या करण्याची धमकी देत निघून जाते.

दोन दिवसांनी स्वप्नाली पोलीस ठाण्यात जाते आणि प्रकाश, त्याची आई, बहिण व त्याच्या एका मित्राविरुद्ध फिर्याद नोंदविते. पहिली पत्नी हयात असताना ते दडवून ठेवून दुसरीशी फसवणुकीने विवाह करणे ही भारतीय दंड विधानाची ४९४ व ४९५ ही कलमे लावली जातात. चार दिवसांनी २७ ऑक्टोबर रोजी प्रभावती पोलिसांकडे जाते व फिर्याद नोंदविते. पण तिची फिर्याद प्रकाशने फसवून दुसरे लग्न केल्याची नसते तर, पती व सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी छळ केल्याची (भादंवि कलम ४९८ए) असते.

कालांतराने स्वप्नालीच्या फिर्यादीवरून न्यायदंडाधिकारी(Judicial Magistrate) न्यायालयात खटला उभा राहतो. प्रकाशचे प्रभावतीशी झालेले पहिले लग्न सिद्ध करण्यासाठी त्या लग्नाचे नोंदणी प्रमाणपत्र (Marriage Certificate) सादर केले जाते. विवाह नोंदणी कार्यालयातील संबंधित कारकून व लग्न लावणारा भटजी यांना साक्षीदार म्हणून उभे केले जाते. कारकून सांगतो, हे प्रमाणपत्र आमच्याच कार्यालयातून दिलेले आहे हे खरे, पण त्यातील दाम्पत्य आमच्या Certificateकार्यालयात कधी आल्याचे मला आठवत नाही. हा कारकून कोर्टात प्रकाशलाही ओळखत नाही. भटजी सांगतो, प्रमाणपत्रावर भटजी म्हणून माझीच सही आहे. प्रकाश व प्रभावती नावाच्या दोघांचे मी लग्न लावल्याचेही आठवते. पण हेच ते दोघे हे मी आत्ता नक्की सांगू शकत नाही.

याच खटल्यात प्रभावती एक प्रतिज्ञापत्र सादर करते. त्यात ती म्हणते की, प्रकाशशी माझे लग्न कधीच झालेले नाही. ज्यांना प्रकाश व स्वप्नालीचे लग्न पसंत नव्हते त्यांनी मला सत्यनारायण पूजेच्या दिवशी घरी जाऊन तसे ‘नाटक’ करायला भाग पाडले. या प्रतिज्ञापत्रावरून प्रभावतीला साक्षीदार म्हणून समन्स व नंतर वॉरन्टही काढले जाते. पण तिचा ठावठिकाणा लागत नाही व तो आजतागायत लागलेला नाही. तिने प्रकाश व त्याच्या कुटुंबियांविरुद्ध केलेल्या छळाच्या फिर्यादीचे पुढे काय झाले, हेही कळायला मार्ग नाही.

उपलब्ध पुराव्यांच्या आधारे, प्रकाशचे प्रभावतीशी पहिले लग्न झालेले होते, असा निष्कर्ष काढत दंडाधिकारी त्याला दोषी ठरवून शिक्षा ठोठावतात. इतर आरोपींना निर्दोष सोडले जाते.  नंतर सत्र न्यायालय प्रकाशलाही निर्दोष ठरविते. त्याविरुद्ध सरकारने केलेल्या अपिलाचा निकाल १७ वर्षांनी आत्ता झाला व त्यात सत्र न्यायालयाचा निकाल कायम केला गेला. विशेष म्हणजे या अपिलात प्रकाशतर्फे कोणीही वकील उभा राहिला  नाही. न्यायाधीशांनीच प्रॉसिक्युटरच्या मदतीने कागद वाचून निकाल दिला. न्यायालयाचे म्हणणे असे पडले की, केवळ विवाह नोंदणी प्रमाणपत्र हा विवाह झाल्याचा निर्णायक पुरावा होऊ शकत नाही. कलम ४९४ व ४९५ चे गुन्हे सिद्ध होण्यासाठी पहिला व दुसरा हे दोन्ही विवाह विधिवत झाल्याचे नि:संशय सिद्ध व्हायला हवे.

या निकालात चूक असे काही म्हणता येणार नाही. कारण न्यायालयास सादर झालेल्या पुराव्यांच्या पलिकडे जाऊन निकाल देता येत नाही. पण त्या पलिकडेही खरोखरच काही असेल तर फसवणुकीने दुसरा विवाह केलेल्या पत्नीला ते सिद्ध करणे किती दुरापास्त असू शकते, हेही यावरून दिसते.

(टिप: व्यक्तिगत जीवनात त्रास होऊ नये यासाठी या लिखाणात पात्रांची खरी नावे न देता प्रकाश, स्वप्नाली व प्रभावती ही काल्पनिक नावे घेतली आहेत.)

Disclaimer :- ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER