शाहिद आफ्रिदीच्या वयाचे गूढ आणि सोशल मीडियावर कॉमेंटसचा पूर

पाकिस्तानी (Pakistan) क्रिकेटपटूंच्या वयाबद्दल नेहमीच शंका असते. त्यामुळे त्यांचे वयाचे विक्रम ग्राह्य धरावेत की नाही याबद्दल क्रिकेट जगतात नेहमीच संभ्रम असतो. यासंदर्भात पाकिस्तानी फटकेबाज ‘बोलबच्चन’ शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) हा सध्या चर्चेत आहे.

एक मार्चला त्याचा वाढदिवस (कितवा ते विचारू नका..तोच तर मुद्दा आहे!) साजरा झाला. दोन दिवस झाले तरी त्याचा वाढदिवस चर्चेत आहे याचे कारण ठरले त्याने स्वतःच केलेले ट्विट.

‘लाला’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या आफ्रिदीने आपल्या वाढदिवशी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलेय, ‘Thank you very much for all the lovely birthday wishes – 44 today! My family and my fans are my biggest assets. Really enjoying my stint with Multan and hope to produce match winning performances for all MS fans.’

यानुसार त्याने स्वतःच मान्य केलेय की 1 मार्च 2021 ला तो 44 वर्षांचा झाला. म्हणजे त्याच्याच म्हणण्यानुसार त्याची जन्मतारीख 1 मार्च 1977 असायला हवी आणि यातच खरी गंमत आहे कारण इएसपीएन क्रिकइन्फो या वेबसाईटनुसार त्याचे वय 41 आहे, त्याच्या स्वतःच्या आत्मचरित्रानुसार त्याचे वय 46 आहे आणि आता तो स्वतःच म्हणतोय की तो 44 वर्षांचा झालाय. एवढे कमी की काय, विकीपेडियावर त्याचे वय 45 आहे. आता यापैकी कोणते वय खरे मानायचे हाच मोठा प्रश्न आहे.

पण आता दोन दिवसांपूर्वी ‘लाला’नेच केलेले व्टिट ग्राह्य धरले तर त्याची जन्मतारीख 1 मार्च 1980 ऐवजी 1 मार्च 1977 असायला हवी.म्हणजे तीन वर्षे त्याने आपले वय चोरले आहे. म्हणजे 1 मार्च 1977 च्या वयानुसार वन डे क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात शतक करण्याचा विक्रम शाहिद आफ्रिदीचा नाहीच..हा विक्रम अफगणिस्तानच्या उस्मान घनीच्या नावावर नोंदला जायला हवा. उस्मानने जुलै 2014 मध्ये 17 वर्ष 242 दिवस वयात वन डे शतक झळकावले आहे आणि आफ्रिदीने आॕक्टोबर 1996 मध्ये शतक झळकावले होते तेंव्हा तो फक्त 16 वर्ष 217 दिवसांचा असल्याचा दावा करण्यात आला होता. पण प्रत्यक्षात त्याचे वय 19 वर्षे 217 दिवस होते. ही लबाडी आता स्वतः त्यानेच उघड केली आहे.

याआधी 2019 मध्येही ‘गेमचेंजर’ या पुस्तकात त्याने स्वतःच लिहिलेय की, I was just nineteen, and not sixteen like they claim. I was born in 1975. So yes, the authorities stated my age incorrectly.

या गोंधळामुळे शाहिद आफ्रिदीचे वय हा सोशल मीडियावर मोठा गमतीचा विषय झाला असून त्यावर वाढदिवस होउन दोन दिवस उलटल्यानंतरही भन्नाट काॕमेंट होत आहेत.

एका काॕमेंटमध्ये म्हटलेय, टी-20 नुसार त्याचे वय 41, कसोटी क्रिकेटनुसार 46 आणि वन डेनुसार 44 आहे आणि तो अजून पाकिस्तान सुपर लीग खेळतोय.

एकाने म्हटलेय की त्याच्याबाबत धावा असो, विकेट असोत की वय असो, सर्वच गोष्टीत थोडे द्या- थोडे घ्या अशी स्थिती आहे. त्याच्यासारख्या दुसरा कुणीच होणार नाही. एक काॕमेंट तर मोठीच गमतीशीर आहे. त्यात म्हटलेय की, त्याचे आत्मचरित्र आणि वय, दोन्ही गोष्टी बरोबर आहेत. तो प्रत्येक वाढदिवशी एक वर्षाने तरुण होतोय आणि त्याचे आत्मरित्र तीन वर्षापूर्वीचे आहे. म्हणून त्याचे वय बरोबरच आहे. त्याचे योग्य वय ठरवण्यासाठी डकवर्थ लुईस पध्दतीचा अवलंब करायला हवा असे एकाने सुचवले आहे.

प्रत्येक पाकिस्तानी खेळाडूबद्दल ही समस्या आहे फक्त ‘लाला’ ने आपले खरेखुरे वय सांगितले म्हणून हा गदारोळ सुरु झालाय असे त्याचा एक समर्थक म्हणतो. तो आणखी 40 वर्ष खेळू शकतो अजून त्याचे वयच कुठे झाले आहे, तो तर किती वर्षांपासून 18 वर्षांचाच आहे असे आणखी एका काॕमेंटमध्ये म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER