माझे ‘मी ‘ पण

माझे 'मी ' पण

क्लिनिकला येणाऱ्या पेशंट कडून अनेकदा एकच तक्रार ऐकायला येते की रागावर कंट्रोलच रहात बघा .” त्यांच्यामुळे “माझी चिडचिड होते ,वगैरे . तेव्हा बरेच वेळा. प्रश्न पडतो की पूर्वीच्या लोकांची किंवा व्यक्तींची कधी चिडचिड व्हायचीच नाही का ? तेव्हा बरेचदा प्रश्न पडतो की मग आजच असे टेन्शन , अन्याय किंवा अन्यायाच्या कल्पनेवरून होणारा त्रास का वाढतोय ?

परवाच एक क्लाएंट बोलतं होती. दुसऱ्यामुळे’ माझी’ चिडचिड होते .’माझा ‘न एकदम पारा चढतो. कोणी बोललेलं’ मला ‘सहनच होत नाही ,’माझी ‘काहीही चुक नसताना दर मिनिटाला का सहन करायचं मी ? ‘माझ्या ‘सहनशक्तीचा त्यांनी अंत का बघायला हवा ? सहन करणारी म्हणून’मलाच’ वेठीस का धरायचे ?

या तिच्या तक्रारींकडे थोडं डोळसपणे बघितलं तर एकदम एक गोष्ट जाणवते .या तिच्या वाक्यातून मी ,माझे, मलाच यासारख्या “मीनाकारी “मध्ये तिने तिचं आयुष्य जडवलेले असल्याचे तात्काळ लक्षात येते.

या दिवाळीत तारकर्लीला तळकोकणात ट्रीपला गेले होते. समुद्रावर सगळे जण पाण्यात खेळण्यात दंग होते .अशावेळी मी दूर एकटीच बसून आजूबाजूला न्याहाळत होते. पुढे अफाट अनंत सागर, वरती अथांग असे आभाळ ,अनेक कणांनी भरलेली वाळू ,शंख ,शिंपले ,त्यातील जीव समुद्राच्या पोटातील सूक्ष्मातिसूक्ष्म जीवसृष्टी ,संध्याकाळचा चंद्रोदय ,अनेक ग्रह ,चांदण्या ! त्यावेळी या अफाट दुनियेतील सूक्ष्मातिसूक्ष्म जीव ‘मी ‘ स्वतः असल्याचे माझे लक्षात आले. माझे अस्तित्व ते किती? प्रत्येक जीव स्वतःत रमलेला. एका शिंपल्यातून एक खेकडा बाहेर आला आणि तिरका चालत पाण्यात दिसेनासा झाला .या खेकड्यांना भक्ष बनवण्यासाठी अनेक कावळे एक झेप घेऊन हळूच एखादा जीव उचलून परत जाऊन झाडावर बसून खात होते. दुर उंचावर घारी आपल्या नियमित वेगात अधांतरी उडत आपला धर्म निभावत होत्या. या त्यावेळच्या माझ्या सृष्टीमध्ये कुणाचं कुणाशी देणंघेणं नव्हतं. माझी मुलं आणि नवरा दूर समुद्रात लाटांशी खेळत होते. यावेळी मी अनुभवलेली शांतता, मला निरर्थक” मीपणाच्या” अस्तित्वाला, मोठेपणाला काटशह द्यायला शिकवत होती. कोण होते मी या अफाट दुनियेत ?…..

काळोख पडायला लागल्यावर, माझी मुले बोलवायला आली ,दंगा करू लागली आणि आपोआपच माझे” ध्यान “आटोपते घ्यावे लागले. कारण आता परत मी नेहमीच्या” मी “च्या दुनियेत आले होते. आता मी मुलांची आई ,नवऱ्याची बायको ासू-सासर्‍यांची सून, भावांची बहीण, वडोद्याची वायरी ,( सून ), तर कुणाची मावशी ,काकू,एक समुपदेशक आणि बरीच काही काही होते.– सर्व भूमिकांच्या वेळी असंख्य वेळा येणारे “मी पण” होते.

मला एकदम माझ्या परवाच्या मीनाकारी मध्ये आयुष्य जडवलेल्या क्लाएंटची आठवण आली…! हा मीच तर तिला तिच्या आयुष्यात वाळवी सारखा पोखरत होता.

फ्रेंड्स! माझ्यातल्या या ‘मी ला ‘सुखवताना स्वत: मुळे,दुसऱ्याला किती दुःख होते याकडे माझे लक्ष नसते. किती जण दुखावले जातात ,त्यांचे आशीर्वाद तर आपल्याला मिळणारच नाहीत याची जाणीवही आपल्याला नसते .आजूबाजूच्या जगाचे, लोकांचे ,त्यांच्या दुःखांचे, वेदनांचे भान असत नाही. मला चांगले शिक्षण मिळेल, मला चांगला जोडीदार मिळेल आणि माझी मुलं खूप बुद्धिमान असतील आणि त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळवून ते सेटल होतील (कदाचित ते मला मग वृद्धाश्रमाचा मार्गही दाखवतील) जीवनाची इतिकर्तव्यता ! आणि मग शेवट. बास्स ? एवढंच आयुष्य ? माझ्या तब्येतीचा खणखणीत पणा व गाठणारी शंभरी यावर, आयुष्याच्या लांबीवरच स्थिर राहणारी जीवन रेषा. पण मग आयुष्याची खोली ? त्याचा विचार कोण करणार ?

याचा अर्थ प्रपंच न करता केवळ परमार्थ करायचा, नेहमीच दुसऱ्यांचा विचार करावा का? तर असं तत्त्वज्ञान कोणत्या संतांनी सांगितलेलं नाही. “आधी प्रपंच करावा नेटका” हेच ते सांगतात.

मग माझे मी पण याला कुंपण घालायचं तर कस आणि का ? तर सुखी आणि समाधानी होण्याच्या रेसिपीतला तो महत्त्वाचा पदार्थ आहे . शेजार्‍याच्या घराला आग लागली आणि आपण जर सुखात निद्रा घेत असू ,तरीही ती माझ्यापर्यंत पोहोचणारच आहे हे नक्की. आणि मुख्य म्हणजे माझ्या क्रोध आणि ताण रुपी षड्रिपूवर मात करण्यासाठी याची गरज आहे.

माझं सुख जर मीपणाचे कुंपण ओलांडून इतरांच्या सुखात आनंद मानणारे असेल, सर्व वस्तू मलाच मिळाव्यात या ऐवजी समाधानी राहून इतरांनाही काहीतरी मिळावे असं वाटू लागेल तर मी मोहापासून ,मत्सर ,द्वेष या पासून दूर राहीन. माझ्या घरात अमुक एक नवीन वस्तू आणली तरीही ती शेजारच्या मैत्रिणी कडच्या पेक्षा कमी किमतीची हा सल असेल तर मी पणाचा सल कायमच राहणार. म्हणूनच समाधानी वृत्ती जी मानण्यावर अवलंबून आहे, ती जोपासणे महत्त्वाचे ठरते.

आपल्याला सर्व काही असूनही दुसऱ्याचं चांगलं झाल्यास आपलं पोट दुखत असेल तर हा व्यायाम (मानसिक) करायला हवा. आत्ता सुखी दिसणाऱ्या लोकांचा, त्यांच्या मागील आयुष्याचा फीडबॅक घेत गेले तर, तो आपल्या आयुष्याच्या कितीतरी पट काळोखा दिसून येतो. मग त्यांच्या त्या काळोखे ढगाला एकच सोनेरी किनार दिसली तर मी दुःखी का व्हावे ? समोरच्या व्यक्तीने अमुक एक गोष्ट केल्याने मी दुःखी झाले,त्या व्यक्तीची अमुक एक कृती मला वारंवार त्रास देते, अशावेळी ती व्यक्ती आपल्या मनातून उतरते आपण चिडतो ,खदखदतो, आपल्याला ताण येतो, परंतु अशावेळी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीची एखादी कृती मला आवडत नाही याचा अर्थ ती व्यक्तीच वाईट आहे, असा होत नाही. मग ताण असह्य होऊन आपण दोषारोप केलेत तर ते नक्कीच खूप तीक्ष्ण असतात. काही वेळाने आपण ते विसरूनही जातो ,पण समोरची व्यक्ती मात्र दुखावली जाते. आणि आपल्या नात्यांमधली ही एक आणखीन निरगाठ निर्माण होते, किंवा एक व्यक्तीच वजा होते. अशावेळी समोरच्या व्यक्तीला दोषी न धरता तिची कृती नाकारली आणि ती सौम्य किंवा योग्य शब्दांमध्ये समोरच्या पर्यंत पोहोचवली तर ?

मनुष्य समाजप्रिय प्राणी आहे. तो एकटा राहून सुखी होईलही पण समाधानी नाही होऊ शकत ! कारण काहीही मिळाल्यावर त्याचा आनंद मनवण्यासाठी सुद्धा आपल्याला सगळ्यांची गरज लागतेच .मग मी सगळ्यांवर राज्य करणार व लोकांनी माझे कौतुक करावे हे किती योग्य आहे ?

“मी इतरेजनांसारखी एक मातीमोल होणारी ईश्वराची प्रतिकृती !” मग मला हे सहन होणार नाही हे म्हणणे ही रास्त नाही. मला माझ्या सहानशक्ती वर हल्ला होऊ द्यायचं नसेल तर थोडंसं निरखून बघा — मी , माझे रंगरूप, संपत्ती शिक्षण बुद्धी हे सगळं जगावेगळे खरच आहे ? की फक्त तीन चार जणांमध्ये थोडी बरी / बरा आणि वासरात लंगडी गाय शहाणी ?
म्हणून तुलना करायला हवी तर स्वतःची स्वतःशी ! मत्सर करायला हवा स्वतःच्या सुखाचा. राग करावा आपल्या दुर्गुणांचा.

मोह ,लोभ धरावा दुसऱ्यातले चांगले गुण मिळवण्याचा आणि मग स्वतःच्या मस्तीत जगण्याचा मदमस्तपणा हवा तर जरूर करावा. कारण ती मस्ती दुसऱ्यांच्या जीवावर नसते तर तो जल्लोष असतो आपल्यातील सद्गुणांचा आणि ज्यामुळे आपल्यात अहंकार येत नाही आणि न्यूनगंड हि दूर होतो. मग आयुष्याचा उत्सव होतो.

इतक्यातच एक सुविचार वाचला की आपला आयुष्य हे फार छोटे आहे. त्याला दुसऱ्यांच्या आयुष्यावर खर्च करू नका. वरवर बघता संभ्रमात टाकणारे वाक्य आहे–दुसऱ्याच्या आयुष्यावर म्हणजे दुसऱ्यांसाठी खर्च करू नका असे नाही, दुसऱ्यांच्या आयुष्यावर टेहाळणी करण्यासाठी त्यांच्या सुखावर, दु :खी होण्यासाठी ,मत्सर ,द्वेष ,असूया करण्यासाठी दुसऱ्याला दुखावण्यासाठी खर्च करू नका. उलट आयुष्य छोटं असल्याने चांगली कृत्ये, जनहितार्थ कामे आणि आयुष्य उपभोगणे यासाठी खर्ची घालावी. आपल्या आसपास अशी उदाहरणं डोळे उघडे ठेवले तर खूप सारी दिसत असतात. म्हणूनच म्हणतात ,”मी पण ज्यांचे पक्व फळापरी गळले हो जीवन त्यांना कळले हो !”

मानसी गिरीश फडके
(समुपदेशक व सायकोथेरपिस्ट)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button