माझे बाबा माझेच नाही, तर अनेकांचे हिरो : धीरज देशमुख

Dhiraj Deshmukh and Vilasrao Deshmukh

मुंबई : “बाबांचा प्रवास आमदारकी, मंत्रिपद ते मुख्यमंत्री असा झालेला मी पाहिला. एक मुलगा म्हणून खंत असायची की, माझे बाबा माझ्यासोबत कमी वेळ घालवतात. मला वडिलांचा सहवास फार मिळाला नाही. पण आज, निवडणूक लढताना, सभागृहात जाताना मला बाबा समजायला लागले. त्यामुळे बाबांनी समाजासाठी खूप केल्याचं जाणवलं. एखादी व्यक्ती आपल्या कुटुंबासाठी खूप काही करू शकते: पण इतरांच्या कुटुंबासाठी किती करू शकते? माझे बाबा माझ्यासाठी हिरो आहेत; पण असे अनेक तरुण मला भेटतात जे म्हणतात, तुमचे बाबा आमचे हिरो आहेत, त्याचा अभिमान मला आजही वाटतो. ” असं धीरज देशमुखांनी सांगितलं.

लातूरची कुठलीही अडचण असेल तर ते आवर्जून बाळासाहेबांना फोन करायचे
“बाळासाहेब थोरात हे लातूरचे पालकमंत्री होते. त्यामुळे त्यांच्याशी आमचा स्नेह होता. बाबा मुख्यमंत्री असल्याने त्यांच्यासोबत विमानात फिरण्याचा छंद पूर्ण व्हायचा. बाळासाहेबांच्या आणि साहेबांच्या जेव्हाही बैठका किंवा दौरा असायचा, लातूरची कुठलीही अडचण असेल तर ते आवर्जून बाळासाहेबांना फोन करायचे. बाबांना माहीत होतं की, नगरपेक्षा जास्त न्याय ते लातूरला देऊ शकतील. १९९९ साली बाळासाहेब थोरात यांनी बाबांकडून कृषी खातं मागितलं आणि बाबांनी ते लगेच दिलं. कारण त्यांना माहीत होतं, की ते या क्षेत्राला पुढारण्याचं काम करतील.” असे सांगत धीरज देशमुखांनी बाळासाहेब थोरातांवर स्तुतिसुमनं उधळली.

यापुढे विकासाचाच पॅटर्न –
“विलासराव देशमुख यांच्या नजरेतील मराठवाडा हा दुष्काळमुक्त मराठवाडा आहे. आमच्या महाविकास आघाडी सरकारचे काही निर्णय हे दुष्काळमुक्तीसाठी घेण्यात आले आहेत. संपूर्ण मंत्रिमंडळ त्या विचाराने चालत आहे. महाराष्ट्र हा नंबर एक होता आणि राहील हे त्यांचं स्वप्न होतं. मला खात्री आहे की, महाविकास आघाडीच्या माध्यमातून यापुडे महाराष्ट्रात विकासाचाच पॅटर्न चालेलं.”

असा विश्वास धीरज देखमुख यांनी व्यक्त केला. ‘संवाद तरुणाईशी’ या कार्यक्रमात राज्यातल्या तरुण आमदारांसोबत सुसंवाद साधण्यात आला. या कार्यक्रमात मंत्री आदित्य ठाकरे, रोहित पवार, आदिती तटकरे, ऋतुराज पाटील, धीरज देशमुख, झिशान सिद्दिकी सहभागी झाले होते. गायक अवधूत गुप्ते यांनी ही मुलाखत घेतली आणि तरुण नेत्यांना बोलते केले.

माझ्यावर कोणीही घराणेशाहीचा आरोप करू शकत नाही – रोहित पवार