बलात्काराच्या धमकीने माझ्या मुलीला प्रचंड मानसिक त्रास झाला- अनुराग कश्यप

Anurag Kashyap

मुंबई :- ‘मला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जातं, पण मी त्याकडे दुर्लक्ष करतो. ट्रोलर्सना आपण किती महत्त्व देतो यावर सगळं अवलंबून आहे. पण माझ्या मुलीला मात्र याचा प्रचंड मानसिक त्रास झाला. तिला होणारा त्रास पाहून वडील म्हणून तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं ही माझी जबाबदारी आहे.  म्हणून मी याविषयी बोलतोय. माझ्या मुलीला बलात्काराची धमकी देणाऱ्या तुमच्या समर्थकांना कशा प्रकारे तोंड द्यायचं?’ असा प्रश्न दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी मोदींना केला.

‘लोकशाही तुम्हाला प्रश्न विचारण्याचा हक्क देते. प्रश्न विचारल्याबद्दल जर मला घाबरवलं जात असेल आणि त्यानंतर अनेकांकडून टीका होत असेल तर मला नाही वाटत की हे वातावरण योग्य आहे’ असं मत अनुरागने मांडलं. आगामी ‘गेम ओव्हर’ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात तो बोलत होता.

आपल्याला ज्या गोष्टी चुकीच्या वाटतात त्याविरोधात नेहमी बोललं पाहिजे. भारताचे नागरिक म्हणून देशाच्या विकासाविषयी प्रश्न विचारणं हा तुमचा अधिकार आहे. त्यामुळे सरकार कोणतंही असो, तुम्ही प्रश्न विचारत राहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान यावेळी अनुरागने ट्रोलिंगविरोधात सशक्त कायद्याची मागणी केली. सत्तेत असलेल्यांनी जर अशा ट्रोलिंगविरोधात परखड मत व्यक्त केलं तर त्याचं प्रमाण निश्चितच कमी होईल, असं तो म्हणाला. मुलीला बलात्काराच्या धमकीप्रकरणी त्याने एफआयआर दाखल केला आहे.