माझी कोरोना चाचणी निगेटिव्ह, तरीही होम क्वारंटाईन होतोय : अमोल कोल्हे

Co Existing with Corona-Amol Kolhe

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांनी होम क्वारंटाईन व्हायचा निर्णय घेतला आहे. दौऱ्यावेळी कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या दोन नेत्यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी स्वतःची कोरोना चाचणी करून घेतली. ती निगेटिव्ह आली, मात्र खबरदारी म्हणून होम क्वारंटाईन व्हायचे ठरवल्याची माहिती डॉ. कोल्हे यांनी ट्विट  करून दिली आहे.

आपल्याला एक महत्त्वाची माहिती शेअर करत आहे. १ ते ४ जुलै या कालावधीत मतदारसंघाच्या दौऱ्यावर होतो. दौऱ्याच्या काळात संपर्क आलेले दोन राजकीय नेते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे कळाले. हे समजल्यानंतर मी स्वत:ची कोरोना चाचणी करून घेतली असून ती निगेटिव्ह आलेली आहे. अशी माहिती अमोल कोल्हे यांनी दिली.

ही बातमी पण वाचा : अमित ठाकरे पुन्हा बंधपत्रित नर्सेसच्या मदतीला, सरकारकडे केली ही मागणी

माझ्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. मात्र पुरेशी खबरदारी घेण्यासाठी मार्गदर्शक सूचनेनुसार होम क्वारंटाईन राहण्याचा निर्णय मी घेतला आहे. सार्वजनिक कार्यक्रमात अथवा दौऱ्यावर असताना, अनेकदा नागरिक सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीत. काही जण मास्कचा वापर करीत नाहीत, असेही कोल्हे यांनी म्हटले आहे.

मी स्वतः डॉक्टर असल्याने परिस्थितीचे गांभीर्य ओळखत आपल्यामुळे कुणाचे आरोग्य धोक्यात येऊ नये, या भावनेतून होम क्वारंटाईन राहण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु मी घरी असलो तरी माझ्या मतदारसंघाबरोबर इतर भागातील नागरिकांच्या संपर्कात राहून कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहे. अशी ग्वाही अमोल कोल्हे यांनी दिली.

सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून विकासकामांमध्ये कुठे खंड पडू देणार नाही. काही अडचण असल्यास आपण मला सोशल मीडियाच्या कुठल्याही प्लॅटफॉर्मवर अथवा संपर्क कार्यालयामध्ये संपर्क करू शकता, असे आवाहन कोल्हे यांनी केले आहे.

तसेच त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील राजगृहावर केलेल्या भ्याड हल्ल्याचाही निषेध नोंदवला आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान ‘राजगृह’ या ठिकाणी काही अज्ञात समाजकंटकांकडून तोडफोड करून नुकसान केल्याचे कळले. राजगृह अनेकांचे प्रेरणास्थान आहे, जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. राजगृहावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करतो, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER