करोनानिवारणात माझंही योगदान ….

Coronavirus - Whatsapp

Shailendra Paranjapeपूर्वीसारखे दिवस राहिले नाहीत, हल्ली सगळं बिघडलं आहे, हल्लीच्या पिढीला काही संस्कार किंवा मोठ्यांचा आदर वगैरे नाहीच, यासारखी वाक्य माणूस बोलू लागला की तो म्हातारा झालाय, असं समजावं. तंत्रज्ञानामुळे जग इतकं पुढं गेलंय आणि भौगोलिक सीमा धूसर होत गेल्यात. परिणामी, देशांच्या, राज्यांच्या किंवा शहरांच्या सीमा अस्तित्वात असल्या आणि त्यांचं म्हणून काही महत्त्व असलं तरी करोनासारख्या (Corona) संकटाच्या काळात माहितीचे अदानप्रदान वेगाने होणे, संकटातल्या माणसांना मदत मिळणे, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि त्यामधे तंत्रज्ञानातल्या प्रगतीने खूपच प्रगती होऊ शकली आहे.

विज्ञान-तंत्रज्ञानातल्या प्रगतीने माणसाचं जगणं सोपं व्हावं, सुखी व्हावं ही अपेक्षा असली तरीही मुळात विज्ञान-तंत्रज्ञानाचा वापर माणूस कसा करतो, यावरच त्याचं म्हणजे तंत्रज्ञानाचं यश अवलंबून आहे. अणूविघटन किंवा न्यूक्लिअर फिशनचा वापर बॉम्ब तयार करून विध्वांस घडवण्यासाठीही केला जाऊ शकतो आणि तसा तो झालाही पण मुळात त्याविषयीचे संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांना हे अभिप्रेत होते का, हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे नॉट मशिन बट मँन बिहाइंड द मशिन डिसाईड्स फेट अर्थात एखादं यंत्र नव्हे तर त्यामागे असलेला माणूस, त्याचा वापर करणारा माणूस त्याचा परिणाम ठरवतो.

हे सारं आठवण्याचं कारण म्हणजे व्हाट्स अपसारखं समाजमाध्यम. संगणक, माहिती-तंत्रज्ञान या क्षेत्रातून प्रगती होत होत इंटरनेट आलं, फेसबुक आलं, लिंक्ड इन आलं, आणि मोबाइलनं सारं जग खिशात बसवून टाकलंय. हल्ली व्हाट्स अप खूपच प्रभावी आहे आणि त्यामुळे त्यातून येणाऱ्या, व्हायरल होणाऱ्या संदेशांमुळे व्हाट्स अपला व्हाटस अप विद्यापीठ असंही संबोधलं जाऊ लागलंय. त्याचं कारण असं की व्हाट्स अपवरून जगातल्या सर्व विषयांवरची ज्ञानगंगा, माहितीगंगा वाहू लागलीय आणि दिलेली माहिती खरी असेल, योग्य असेल याची कोणतीही खात्री नसताना, खातरजमा केलेली नसताना बोटाने एक कळ दाबून ही सारी माहिती पुढे हजारो लाखो लोकांपर्यंत पाठवण्याची सोयही झालीय.

घरात भाजी कोणती करावी हे ठरवण्याचं स्वातंत्र्य नसलेले उठसूट पंतप्रधानांनी काय करावे, याचे सल्ले व्हाट्स अपवरून देऊ लागलेत, देऊ शकतात कारण त्याला काहीही उत्तरदायित्व नाही. सायबर कायदे आहेत, त्यात तरतुदीदेखील आहेत आणि बेजबाबदारपणे काही माहिती टाकली गेली आणि त्याचे सामाजिक दुष्परिणाम ओढवले तर कारवाई करण्याची मुभाही आहे. पण आपल्या व्यवस्थेत असे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाणही तुलनेने कमीच आहे. त्यामुळेच मग रोज सकाळी उठून व्हाट्स अपवरून ज्ञान घेणं हे सकाळच्या चहाइतकं आवश्यक झालंय. त्यात स्वतः फारसं डोकं न चालवता, एका ग्रुपवरून दुसऱ्या ग्रुपवर अफाट माहिती बेफाटपणे पाठवणे, हेही सहज करता येते.

हे सारं करताना लोक वहावत चाललेत आणि त्यातूनच मग करोना विषयाचे संदेश पाठवतानाही धरबंद उरलेला नाही. त्यामुळे मग कोणताही व्हाट्स अप ग्रुप उघटला की त्यात रोजच्या रोज कोणी तरी ओळखीची व्यक्ती मरण पावल्याची बातमी आणि त्यानंतर ग्रुपवरील अनेकांनी सोडलेले उसासे, उमाळे असंच चित्र दिसतंय. व्हाट्स अपवरून सकाळी सकाळी कोणी तरी मरण पावल्याचं कळण्यापेक्षा एखादा करोनावर मात करून बरा झालेला रुग्ण, करोनातून बरा झाल्यावर प्लाझ्मा दान करणारा रुग्ण, अडचणीतल्या इतरांना मदत करणारी व्यक्ती, संस्था, गणेश मंडळ यांची माहिती दिली तर किमान सकाळी सकाळी मनात निराशोचं मळभ दाटणार नाही. उलट अगदी मुंगीलाही जगायची दुर्दम्य इच्छा असते, त्याप्रमाणे माणसाची जीवनेच्छा आणि करोनाच काय कोणत्याही साथीवर मात करण्याची वृत्ती वाढेल, असं काही व्हाट्स अपवर टाकता आलं तर बघा.

जाता जाता दत्तवाडी पोलीस ठाण्यातले फौजदार राजू पवार यांना लागोपाठ दोनदा करोना झाला आणि त्यांनी त्यावर मात केली. पुस्तके वाचणं, ओळखीच्या लोकांशी फोनवरून गप्पा मारणं यातून हे शक्य झालं, असं त्यांचं म्हणणं आहे. करोनावर मात करता येते आणि त्यासाठी मनाची सकारात्मकता हवी, हे जरी आपण रोज सर्वांना व्हाट्स अप वरून सकाळी सकाळी सांगितलं तरी करोना निवारणात आपलं राष्ट्रीय आणि मानवी योगदान होऊ शकेल. तेवढं तरी करूयात.

शैलेन्द्र परांजपे

Disclaimer : ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button