म्युच्युअल फंडातही ओघ वाढता

- अर्थव्यवस्था सक्षम असल्याने गुंतवणूक वाढती

mutuale fund

मुंबई : अर्थव्यवस्था सक्षम असल्याने शेअर बाजार मागील दोन महिन्यांपासून सातत्याने वाढता आहे. या तेजीमुळे म्युच्युअल फंडातही गुंतवणुकीचा ओघ वाढता आहे. तेजीच्या लाटेवर स्वार झालेल्या शेअर निर्देशांकांनी भांडवली बाजारात नवनवे रेकाॅर्ड स्थापन केले करत असताना म्युच्युअल फंडामध्येही गुंतवणुकीचा ओघ वाढवला आहे. डिसेंबरमध्ये नियोजनबद्ध गुंतवणूक योजनांमधून (एसआयपी) तब्बल ८५१८ कोटींची गुंतवणूक झाली आहे. या माध्यमातून होणारी ही आजवरची सर्वात मोठी गुंतवणूक आहे. यासंबंधीचा अहवाल बुधवारी सायंकाळी मुंबईत प्रकाशित झाला. म्युच्युअल फंड उद्योगाची शिखर संघटना असलेल्या असोसिएशन आफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या आकडेवारीनुसार डिसेंबरमध्ये ‘एसआयपी’मधून ८५१८.४७ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. यात नोव्हेंबरच्या तुलनेत २४५ कोटींची वाढ झाली. नोव्हेंबरमध्ये या माध्यमातून ८२७२ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती.

हा ओघ वाढल्याने एसआयपीमधील एकूण मालमत्ता ३.७१ लाख कोटींवर गेली आहे. २ कोटी ९७ लाख एसआयपी गुंतवणूकदार आहेत. यामधील गुंतवणूक वाढत असली तरी इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा ओघ कमी झाला आहे. इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक डिसेंबरमध्ये ७८ टक्क्यांनी कमी झाली. गुंतवणूकदारांनी १३११ कोटी इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवले. अर्थसंकल्प लवकरच जाहीर होणार असून कर सवलतीच्या दृष्टीने म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा ओघ वाढला आहे. सर्वसाधारणपणे या कालावधीत बजेटपूर्वी असा ट्रेंड असतो. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा ओघ वाढत असून सरत्या वर्षात फंडातील गुंतवणुकीत तब्बल चार लाख कोटींची भर पडली आहे, असे संघटनेचे म्हणणे आहे.

डिसेंबर २०१८ मध्ये म्युच्युअल फंड उद्योगाकडे एकूण २२.८६ लाख कोटींची मालमत्ता होती. २०१९ मध्ये त्यात वाढ झाली. सलग सातव्या वर्षी गुंतवणुकीत वाढ झाली आहे. नोव्हेंबर २००९ मध्ये म्युच्युअल कंपन्यांकडील एकूण मालमत्ता ८.२२ लाख कोटी होती. २०१९ मध्ये ती २७ लाख कोटींपर्यंत वाढली. मागील १० वर्षांत गुंतवणुकीत तीन पटीने वाढ झाली.