
कोणतीही भाजी असो वा आमटी, तेल गरम झाले की नाही हे बघण्याकरिता मोहरी (Mustard) हमखास टाकली जाते. मोहरी तडतडली की छान फोडणी बसली हे पक्के. मोहरी बारीक असो वा जाड मसाल्याच्या डब्यात याला निश्चित स्थान असतेच. खिचडीवर तिखटाची खमंग फोडणी वा तडका द्यायचा असला की मोहरी आवश्यकच असते. अशी ही मोहरी औषधी गुणाचीदेखील आहे बरं का!
- यालाच राजिका, तीक्ष्णगंधा, क्षुज्जनिका असेही पर्याय आले आहेत. मोहरी तीक्ष्ण कडू तिखट रसाची व गरम असते.
- मोहरीचा वाटून केलेला लेप सूज कमी करणारा आहे. संधिवात, फुफ्फुस, पोटदुखी यकृतावर सूज यावर मोहरीचा लेप लावतात.
- चर्मरोग, त्वचेला खाज सुटणे यावर मोहरी वाटून हा लेप त्वचेवर लावतात. त्यामुळे कफामुळे उत्पन्न त्वचारोग कमी होतो.
- कष्टार्तव, मासिक स्राव व्यवस्थित होत नसल्यास मोहरीचा काढा टबमध्ये टाकून बसल्यास कटिशूल, ओटीपोटीमध्ये वेदना होत असतील तर त्या थांबतात व मासिक स्राव व्यवस्थित होतो.
- मोहरीचा लेप थंड पाण्यातच करावा. एखाद्या सुती तलम कपड्यावर लावून नंतर बांधावा. १०-१५ मिनिटानंतर उष्णता जाणवायला लागली की, लगेच काढून घ्यावा.
- मोहरी उत्तम कृमीहर आहे. जंत होऊ नये याकरिता मोहरी भाजी, आमटीत नक्की वापरावी.
- काटा टोचला असेल, काटा त्वचेच्या आत असेल तर मोहरीचा लेप तूप-मध यासह लावल्यास काटा बाहेर पडतो.
- मोहरीचा लेप पापण्यावर येणाऱ्या गाठीवर लावल्यास त्या विरून जातात.
- मोहरी जास्त प्रमाणात घेतल्यास तीक्ष्ण आणि उग्र असल्याने वांती होते. म्हणूनच भोजनातून विषबाधा झाल्यास किंवा विष पोटात गेल्यास मोहरी व मीठ गरम पाण्यासह प्यायला देतात जेणेकरून वांतीद्वारे सर्व विष पोटातून बाहेर पडेल.
नजर उतरविण्याकरिता मीठ-मोहरी वापरली जाते. त्याचा फायदा होतो की नाही हा वेगळा विषय आहे; परंतु आहारात कमी प्रमाणात का होईना ही मोहरी / राजिका नक्कीच फायदेशीर आहे.
ह्या बातम्या पण वाचा :
- मिरे – स्वयंपाकघरातील तिखट द्रव्य
- जायफळ – सुगंधी व उपयोगी मसाला द्रव्य
- दालचिनी – सुगंधी मसाला द्रव्य !
- भाजीत भाजी मेथीची !
- धणे – अनेक व्याधींना हरण करणारे !
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला