बेलापूर येथील मुस्लिमांनी राम मंदिरासाठी दिले ४४ हजार रुपये

Muslims in Belapur paid Rs 44000 for Ram Mandir

श्रीरामपूर : श्रीरामपूर तालुक्यातील (Shrirampur) बेलापूर (Belapur) येथील मुस्लिम समाजाने श्रीराम मंदिरासाठी ४४ हजार १११ रुपयांची देणगी राम मंदिराचे कोषाध्यक्ष, गोविंद देवगिरी महाराज (राष्ट्रसंत आचार्य किशोरजी व्यास) यांच्याकडे सुपूर्द केली. बेलापूर हे देवगिरी महाराज  हे यांचे जन्मगाव आहे. देवगिरी महाराज गावात येणार होते.

महाराज येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर जामा मशीदचे मुख्य ट्रस्टी जाफर आतार, बहोद्दीन सय्यद हैदर, अकबर टिन मेकरवाले, हाजी ईस्माईल रफीक शेख, शफीक बागवान, मुनीर बागवान, मोहसीन सय्यद, गँसुद्दीन शेख, आजिज शेख यांनी मुस्लिम समाजाची तातडीची बैठक बोलविली. राम मंदिराला देणगी देण्याचा विषय घेण्यात आला. मुस्लिम समाजाने वर्गणी गोळा केली.आचार्य व्यास यांचे गावात आगमन होण्यापूर्वी ३३ हजार रुपये जमा झाले. आचार्य व्यास यांचे जामा मशीदमध्ये आगमन झाल्यानंतर मुख्य ट्रस्टी जाफर आतार व बहोद्दीन सय्यद, हाजी ईस्माईल, अकबर टिन मेकरवाले यांनी त्यांचे स्वागत केले.

जमा झालेल्या वर्गणीत आणखी ११ हजार रुपये टाकून मुस्लिम समाजाच्यावतीने राम मंदिर बांधकामासाठी ४४ हजार रुपयांची देणगी देण्यात आली. हाजी ईस्माईल म्हणाले, राम मंदिराच्या उभारणीत बेलापुरातील मुस्लिम  समाजाचा सहभाग असावा म्हणून आम्ही हा खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला. अकबर टिन मेकरवाले म्हणाले, एका चांगल्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याचे भाग्य मुस्लिम समाजाला लाभले. गावाच्यावतीने आणखी मोठी मदत करण्याचा प्रयत्न करू.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER