सांगलीत 22 फेब्रुवारी रोजी संगीत महोत्सव

सांगली :-  संगीत साधना संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त पंडित काशिनाथ बोडस यांच्या स्मरणार्थ दि.22 फेब‘ुवारी रोजी सांगलीत संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विष्णुदास भावे नाट्यमंदिरात दोन सत्रात होणार्‍या या महोत्सवात शास्त्रीय गायन, व्हायोलिन वादन आणि तबल्याची जुगलबंदी याचे सादरीकरण होणार असल्याची माहिती संगीत साधना संस्थेचे अध्यक्ष डॉ. बाळकृष्ण चैतन्य यांनी दिली आहे.

दुर्घटना : सन २०१९मध्ये १७९ मुंबईकर जीवाला मुकले

ग्वालीयर घराण्याचे उत्तम गायक, रचनाकारा आणि संगीत शिक्षक असा त्रिवेणीसंगम जुळवून आणणारे पंडित काशिनाथ बोडस यांचे 95 मध्ये साठाव्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी अनेक शिष्य तयार केले असून संगीत क्षेत्रात शिष्यांनी नाव कमावले आहे. त्यापैकी एक शिष्य मनू श्रीवास्तव ( अमेरिका) यांच्या पुढाकाराने गुरुच्या स्मरणार्थ या संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आकाशवाणीचे सतारवादक रफिक नदाफ, वाद्यनिर्माते मजिदभाई आणि नईम सतारमेकर यांच्या अथक प्रयत्नांतून हा महोत्सव आकाराला आला आहे. यासाठी मेसर्स बी.जी. चितळे, सांगली अर्बन बँक, हरमन चहा आणि डॉ. के.एल. पटेल यांचे प्रायोजकत्व आहे. पहिल्या सत्राचे उद्घाटन संगीत साधना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अरुण जोशी आणि डॉ. ए.टी. मोहिदेकर यांच्या हस्ते तर सायंकाळच्या सत्राचे उद्घाटन डॉ. विकास गोसावी आणि प्रसिध्द गायिका सुभदा पराडकर यांच्या हस्ते होणार आहे.