‘हीरोपंती २’ ला एआर रहमान देणार संगीत

अभिनेता टायगर श्रॉफच्या (Tiger Shroff) ‘हीरोपंती २’बाबत आम्ही तुम्हाला नुकतीच माहिती दिली होती. २०१४ मध्ये ‘हीरोपंती’ नावाने आलेल्या सिनेमातून टायगर श्रॉफने रुपेरी पडद्यावर आगमन केले होते. साजिद नाडियाडवाला निर्मित आणि शब्बीर खान दिग्दर्शित या सिनेमात कृती सेनन त्याची नायिका होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. या सिनेमाच्या सिक्वेलची तेव्हा चर्चा सुरु झाली पण सिक्वेलची सुरुवात आता सहा वर्षानंतर झाली आहे. या सिनेमाचे शूटिंग सुरु झाले असून आता या सिनेमाला ए. आर. रहमान (A. R. Rahman) संगीत देणार आहे, स्वतः टायगर श्रॉफने सोशल मीडियावर याची माहिती देऊन आनंद व्यक्त केला आहे.

टायगर श्रॉफने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे, ‘निर्मात्यांनी अॅकेडमी पुरस्कार विजेता संगीतकार ए. आर. रहमान आणि गीतकार महबूब यांची सिनेमाच्या संगीतासाठी निवड केली आहे. महान उस्ताद ए.आर. रहमान यांच्यासोबत काम करण्याचा आनंद आहे.’ ए. आर. रहमान आणि महबूब यांनी रामगोपाल वर्माच्या ‘रंगीला’सह अनेक सिनेमांसाठी एकत्र काम केले आहे. आता बऱ्याच काळानंतर हे दोघे पुन्हा ‘हीरोपंती २’ साठी एकत्र येत आहेत.

‘हीरोपंती 2’ मध्ये टायगर श्रॉफसोबत त्याच्या पहिल्या सिनेमाची नायिका कृती सेनन (Kriti Senon) हिची निवड न करता निर्मात्यांनी तारा सुतारियाची (Tara Sutaria) नायिका म्हणून निवड केली. काही दिवसांपूर्वीच टायगरने त्याच्या या सिनेमाचे पोस्टर रिलीज करून सिनेमाच्या रिलीजची तारीखही जाहीर केली होती. मात्र त्याच्या या सिनेमाचे पोस्टर हे हॉलिवूडमधील सुपरहिट जॉन विक या सिनेमाच्या पोस्टरची कॉपी असल्याची टीकाही त्याच्यावर करण्यात आली होती. या सिनेमाची निर्मितीही साजिद नाडियाडवालाच करीत आहेत. टायगरचे यावर्षी दोन ते तीन सिनेमे रिलीज होणार असून यावर्षी तो चांगलाच धमाका करणार असल्याचे दिसत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER