
कोल्हापूर : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचा ८० वा वाढदिवस कोल्हापूर (Kolhapur) जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे साजरा झाला. येथील राजर्षी शाहू सांस्कृतिक मंदिर येथे व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला.याप्रसंगी बोलताना मंत्री मुश्रीफ यांनी पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमात शरद पवार यांच्याविषयी बोलताना मंत्री मुश्रीफ भावूक बनले. २००९ मधील आठवण सांगताना त्यांचा कंठ दाठून आला.
मुश्रीफ यांनी जुन्या आठवणींना उजाळा देताना म्हणाले, ‘२००९ मध्ये मिरजला जातीय दंगल घडली. त्या दंगलीचा परिणाम म्हणून पश्चिम महाराष्ट्रातील दोन्ही काँग्रेसचे अनेक नेते पराभूत झाले.त्यावेळच्या निवडणुकीत मी, प्रचंड मतांनी विजयी झालो. राज्यात काँग्रेस (Congress), राष्ट्रवादीची (NCP) सत्ता आली. त्यावेळी शरद पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली, आज मला सगळयांत जास्त आनंद झाला असेल. सत्ता आली. परंतु माझा, हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) नावाचा अल्पसंख्याक कार्यकर्ता निवडून आला त्याच्यासारखा दुसरा आनंद माझ्या जीवनात नाही. पवारांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला पाठिंबा दिला. ’ पवार यांच्याविषयीच्या बोलताना मुश्रीफांच्या डोळयांच्या कडा ओलावल्या. यामुळे सभागृहातील वातावरणाचा नूर पालटला.
शरद पवार या ही बाबतीत विक्रम करतील
मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘शरद पवार यांना चांगले आरोग्य लाभो. पवार यांनी समाजकारण आणि राजकारणात अनेक विक्रम केले आहेत. ते वयाची शंभर पार करुन या ही बाबतीत विक्रम नोंदवतील. उर्वरित आयुष्यातही ते राज्याच्या आणि देशाच्या सेवेसाठी काम करत राहतील अशी सदिच्छा व्यक्त करतो.’
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला