कोरोना लसीकरणासाठी महापालिका पूर्ण क्षमतेने सज्ज ; मुंबईचा जम्बो प्लान

मुंबई : संपुर्ण वर्ष संपुर्ण जग कोरोनासोबत लढा देत आहे. अखेर जीवघेण्या कोरोनावर लस उपलब्ध झाली आहे. लशीला मान्यता मिळताच मुबईने लसीकरमासाठी जम्बो प्लानिंगदेखील (jumbo plan) केले आहे.

लसीकरणासाठी (corona vaccination) महापालिका पूर्ण क्षमतेने सज्ज असून, १०० केंद्रांमध्ये या लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. गरज भासल्यास जंबो कोविड सेंटरमध्येही ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच दिवसाला ५० हजार जणांना ही लस टोचली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

लसींचा साठा करून ठेवण्यासाठी स्टोरेज सेंटर बनवण्यात आले आहेत. त्यामुळे ही लस उपलब्ध होताच प्रथम फ्रंट लाईन योद्धांना टोचली जाईल. तसेच मुंबईची लोकसंख्या दीड कोटींच्या घरात असल्याने, प्रत्येकाला लस टोचण्याचे नियोजन आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे. पालिकेच्या प्रत्येक वॉर्डात किमान ५ लसीकरण केंद्र उभारण्यात येणार असून, संपूर्ण मुंबईत १०० लसीकरण केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

जम्बो सेंटर –

बीकेसी, गोरेगाव नेस्को, वरळी एनएससीआय, महालक्ष्मी, दहिसर, मुलुंड आदी ठिकाणी जंबो कोविड सेंटर उभारली आहेत. तेथे आता रुग्णसंख्या फारच कमी असल्याने या जंबो कोविड सेंटरचा उपयोग लसीकरणासाठी करण्यात येणार आहे. मात्र, बाधित रुग्ण आणि लसीकरणासाठी आलेले नागरिक यांचा संबंध येणार नाही, याची दक्षता घेण्यात येणार आहे. दोन्ही विभागासाठी स्वतंत्र मार्ग असतील असेही काकाणी यांनी स्पष्ट केले.

मुंबईत कोरोनाचा आजार नियंत्रणात येत असून याबाबत उपलब्ध होणारी लस आणि त्यासाठीची उपाययोजना आदींच्या लसीकरण या पार्श्वभूमीवर, आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सोमवारी आढावा घेतला. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलतांना काकाणी यांनी, पहिल्या टप्प्यात सुमारे सव्वा लाख वैद्यकीय खात्यातील लोकांना लस टोचण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यापूर्वी लसीकरणासाठी आठ केंद्रे नियुक्त करण्यात आली होती. त्यापैकी केईएम, नायर, कूपर आणि सायन रुग्णालयात दररोज दोन हजार लोकांना लस देण्याचे नियोजन होते. तर वांद्रे येथील भाभा रुग्णालय, सांताक्रूझचे व्ही. एन. देसाई हॉस्पिटल, घाटकोपरचे राजावाडी हॉस्पिटल आणि कांदिवलीचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल या उर्वरित चार केंद्रांत, दररोज प्रत्येकी एक हजार लोकांना लस देण्याचे नियोजन होते. त्यामुळे दररोज १० हजार ते १२ हजार व्यक्तींना लसीकरण करण्यात येण्याची शक्यता होती. मात्र, आता दररोज ५० हजारांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी जंबो कोविड सेंटरचा उपयोग करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER