कोरोनाने महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट

KMC

कोल्हापूर : कोरोनाने (Corona) जगाचेच अर्थकारण बिघडविले आहे. महापालिकाही त्याला अपवाद नाही. कोरोनाचा खर्च आवरताना महापालिकेच्याही नाकी नऊ आले आहे. महापालिकेने आजवर कोरोना प्रतिबंधासाठी सुमारे आठ कोटींवर खर्च केला आहे. निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीमुळे उद्दिष्टाच्या अवघ्या २५ टक्‍क्‍यांचीच वसुली झाली आहे. इतर वर्षांच्या तुलनेत महापालिकेकडे आता शंभर ते सव्वाशे कोटी रुपये कमी आहेत. याउलट खर्च वाढला आहे. परिणामी सर्व विकासकामे ठप्प झाली आहेत.

केवळ कोरोना आणि त्या अनुषंगाने कराव्या लागणाऱ्या उपाययोजना, कोविड सेंटर (Corona center) उभारणी, तेथील खर्च, डॉक्‍टर्स व नर्ससह इतर स्टाफच्या नव्या नेमणुका व वेतनावरचा खर्च, आयसोलेशन, सावित्रीबाई फुले हॉस्पिटलची नव्याने उभारणी, या सर्व गोष्टी महापालिकेला कराव्या लागल्या. गेल्या सहा महिन्यांत महापालिकेला कोरोना प्रतिबंधासाठी मोठा खर्च करावा लागला आहे.

अनेक सामाजिक संस्थांनी मदतीचा हात दिला असला तरी या काळात वसुली रखडल्याने महापालिकेच्या तिजोरीत खडखडाटच आहे. आयसोलेशन येथे नव्याने ५० वॉर्डसाठी एक कोटी खर्च झाले. सावित्रीबाई फुले हॉस्पिटल नवा वॉर्ड ५० लाख खर्च, विविध कोविड सेंटरवरचा खर्च २० लाख, रुग्णवाहिका, शववाहिका एक कोटी, स्मशानभूमीवरचा ५० लाख, याशिवाय महापालिकेचे दैनंदिन खर्च थांबलेले नाहीत.

महापालिकेचा  अत्यावश्‍यक आस्थापना व वेतन खर्च दरमहा १७ कोटी, वीज बिले ३ कोटी ५० लाख असा महिन्याचा खर्च कायम आहे. महापालिकेचे २०२०-२०२१ चे उद्दिष्ट ४३९ कोटी उत्पन्नाचे आहे. प्रत्यक्षात गेल्या सहा महिन्यांत ११३ कोटी रुपयांची वसुली झाली. पुढील सहा महिन्यांत सुमारे २२५ कोटी रुपयांची वसुली करावी लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER