महापालिका निवडणुकीची रणधुमाळी फेब्रुवारीत

Election-commission

मुंबई : कार्यकाळ पूर्ण झालेल्या किंवा लवकरच मुदत संपणाऱ्या कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, वसई-विरार, औरंगाबाद आणि कोल्हापूर या पाच महानगरपालिका, अंबरनाथ, कुळगाव-बदलापूरसह १५ ते २० नगरपालिका, काही नगरपंचायती आणि राज्यातील सुमारे १४ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका (Gram Panchayat elections) येत्या फेब्रुवारीत घेण्याची तयारी राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली आहे.

करोनाचे मोठे संकट असतानाही बिहार विधानसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या. या पार्श्वभूमीवर राज्यातील महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे. परंतु करोना रुग्णसंख्या आटोक्यात आली तरच फेब्रुवारीत निवडणुका घेण्याचे नियोजन आहे. करोनामळे एप्रिल ते जून या कालावधीत मुदत संपलेल्या आणि नवनिर्मित अशा १,५६६; तसेच जुलै ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या आणि नवनिर्मित १२ हजार ६६७ अशा एकूण १४ हजार २३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी मतदार याद्या अद्ययावत केल्या जात आहेत. यापैकी एप्रिल ते जून या कालावधीत मुदत संपलेल्या १,५६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी ३१ मार्च रोजी मतदान होणार होते; परंतु करोनामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या.

मतदार याद्यांत नाव नोंदविलेल्या सर्वाना मतदान करता यावे किंवा निवडणूक लढविता यावी, हे लोकशाहीचे मूलभूत तत्त्व आहे. त्यामुळे विधानसभा मतदारसंघाच्या २५ सप्टेंबर रोजी अस्तित्वात असलेल्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य़ धरण्यात येतील. त्या आधारावर तयार करण्यात येणाऱ्या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या संबंधित ठिकाणी १ डिसेंबर रोजी प्रसिद्ध केल्या जातील. हरकती व सूचनांसंदर्भातील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १० डिसेंबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील, असे राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी सांगितले.

दिवाळीनंतर करोना रुग्णांची संख्या रुग्ण वाढू लागली आहे. संख्या नियंत्रणात राहिल्यास जानेवारीअखेरीस किंवा फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवडय़ापर्यंत निवडणुका घेण्याची योजना आहे. अर्थात सारे करोना किती आटोक्यात राहतो यावर अवलंबून असेल. रुग्णसंख्या वाढल्यास एप्रिल-मे महिन्याशिवाय पर्याय नसेल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

.. या निवडणुका विचाराधीन

– कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, वसई-विरार, औरंगाबाद, कोल्हापूर महापालिका

– अंबरनाथ, कुळगाव-बदलापूरसह १५ ते २० नगरपालिका, काही नगरपंचायती

– राज्यातील सुमारे १४ हजार ग्रामपंचायती

होणार काय?

करोनामुळे लांबणीवर पडलेल्या राज्यभरातील १४ हजार २३३ ग्रामपंचायती तसेच महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. राज्यातील करोनास्थिती नियंत्रणात येताच या ग्रामपंतायतींच्या निवडणुका फेब्रुवारीत घेण्याची तयारी आयोगाने केली आहे.

तयारी काय?

१ डिसेंबर २०२० रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यावर ७ डिसेंबपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर १० डिसेंबरला अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी शनिवारी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER