निवडणुकीचे पडघम वाजताच इच्छुकांची समाजकार्यासाठी धडपड

Aurangabad news

औरंगाबाद : महापालिकेच्या निवडणुकीचे उद्दिष्ट समोर ठेवून इच्छुकांनी समाजकार्याचा चांगलाच सपाटा लावला आहे. मतदारांच्या समस्यांना तळहातावर झेलत समाजकार्य करण्याची आणि जनहितासाठी कार्यक्रम राबवण्याची इच्छुाकांमध्ये चढाओढ दिसून येत आहे. एक प्रकारची समाजकार्याची धुळवडच इच्छुकांमध्ये सुरू झाली आहे. उमेदवारीची अपेक्षा समोर ठेवून चर्चेत राहण्याची ही उठाठेव शहरात सर्वत्र दिसत आहे. मागील पाच वर्षे बिळात लपलेले हवशे-नवशे आता बाहेर पडू लागले आहेत. वॉर्डातील कोणत्याही सार्वजनिक कामात ज्यांचा कधीच सहभाग नव्हता आता त्यांच्याच पुढाकाराने त्यंाच्या होर्डींगसह कार्यक्रम आयोजि केले जाऊ लागले आहेत. त्यातील काही समाजकार्ये पुढील प्रमाणे

मोफत आरोग्य शिबिर : महापालिका निडणुकीच्या तोंडावर अचानकच मतदारांच्या आरोग्याची चिंता इच्छुकांना भासत आहे. मतदारांना आकर्षित करणे हा हेतू समोर ठेऊन ठिकठिकाणी मोफत आरोग्य शिबिरे इच्छुकांकडून आयेाजित करण्यात येत आहेत.

मोफत पाण्याचे टँकर : पाणी समस्येमुळे त्रासलेल्या नागरीकांचा कळवळा येऊन माेफत पाण्याचे टँकर इच्छुकांकडून सुरू केले जाऊ लागले आहेत. एवढेच नाही तर तुमच्या पाण्याची समस्या आम्ही पूर्णपणे सोडवू अशी ग्वाही ही इच्छुकांकडून दिली जात आहे.

विविध प्रमाणपत्रांसाठी शिबीर : रेशन कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्डसारखे इतर महत्वाची कागदपत्रे , प्रमाणपत्रे काढून देण्यासाठी शिबिराचे आयोजन सुरू आहे. अनेक वॉर्डात असे राजकीय मंडप दिसून येत आहेत.

मोठ्या देणग्यांचे दान : सोशल मिडीयाच्या आधारे आपले अभिवादन व्यक्त करणारे आता मात्र महापुरूषांच्या जयंती , पुण्यतिथी, धार्मिक कार्यक्रम, धार्मिक यात्रांना सढळ हाताने देणगी देतांना दिसत आहेत.