महापालिकेच्या राजकीय जोडण्या वेगावल्या : नेत्यांची कसोटी

Satej Patil - Chandrakant Patil - Hasan Mushrif

कोल्हापूर : खुद्द पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांचा विधानपरिषदेचा मतदार संघ, मनपाच्या राजकारणात शिवसेना आणि राष्ट्रवादीची किंगमेकरची धडपड, प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना शिक्षक आणि पदवीधरमधील पराभव धुवून काढण्याची संधी, महाडीक गटाची प्रतिष्ठा, आदी राजकीय कंगोरे घेवून यंदाची महापालिका निवडणूक होत आहे. नेत्यांची कसोटी पाहणाऱ्या या निवडणुकीत आतापासून राजकीय जोडण्या घातल्या जात आहेत.

काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी (NCP), शिवसेना (Shiv Sena) यांनी स्वतंत्रपणे महापालिका निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. निवडणुकीनंतर महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) स्थापन केली जाणार आहे. तर भाजप आणि ताराराणी आघाडी एकत्रित निवडणुकीला सामाेरे जाणार आहेत. पालकमंत्री तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून सतेज पाटील यांच्यासाठी महापालिका निवडणूक विशेष प्रतिष्ठेतेची आहे. ना.पाटील यांची विधानपरिषदेची वाट सन्मानजनक आणि प्रशस्त करणारी ही निवडणूक असल्याने ते ताकदीने तयारीला लागले आहेत.

महाविकास आघाडी स्वतंत्रपणे लढेल त्यानंतर सत्तासुत्र ठरवून एकत्र येईल. भाजप-ताराराणीला चेकमेट देण्यासाठी प्रबळ काही ठिकाणी तिन्ही पक्ष एकच उमेदवार देवू शकतात, असे संकेत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत. मागील निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी स्वतंत्र लढले तरी अनेक प्रभागात एकमेकाला बाय दिला. आता हीच खेळी तीन्ही पक्ष मिळून खेळणार असल्याने निवडणुकीत रंगत वाढणार आहे. आ. चंद्रकांत पाटील यांना मनपावर भाजपचा झेंडा फडकविण्याचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. तसेच शिक्षक आणि पदवीधरमधील पराभव धुवून काढण्यासाठीच आ. पाटील यांनी प्रबळ उमेदवारांच्या घरात जावून भेटी घेण्यास आतापासूनच सुरुवात केली आहे.

महाडिक गटाला विधानसभा आणि लोकसभेचा पराभव पुसून पुन्हा ‘कमबॅक’ करण्यासाठी महापालिकेच्या निमित्ताने मोठी संधी आहे. शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीत आघाडी घेण्यासह विधानसभा निवडणुकीसाठी आत्मविश्वास वाढविणारी ही निवडणूक माजी आमदार राजेश क्षीरसागर हे सावधपणे राजकीय जोडण्या घालत आहेत. यानिमित्ताने वरवर सरळ वाटणारा महापालिकेच्या राजकारणाचा अंतरंग मात्र गुंतागुतींचा बनत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER