विनामास्क फिरणाऱ्यांवर महापालिकेची गांधीगिरी

Kolhapur

कोल्हापूर :- माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत नो मास्क नो एन्ट्री (NO Mask No Entry) या उपक्रमांतर्गत मास्क नसलेल्या नागरिकांना महानगरपालिकेच्यावतीने आणि चेंबर ऑफ कॉमर्स तसेच विविध व्यापारी असोशिएशनच्या सहकार्याने मोफत मास्क आणि गुलाबपुष्प देऊन गांधीगिरी पद्धतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यापुढे कायम मास्क लावण्याचा सल्लाही देण्यात आला.

अनेक नागरिक विनामास्क रस्त्यावरून फिरताना आढळतात, या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आणि चेंबर ऑफ कॉमर्स, महाद्वार रोड व्यापारी असोशिएशन, कापड व्यापारी संघ अशा शहरातील विविध व्यापारी असोसिएशन व संघटनांच्या सहकार्याने विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर आज दंडात्मक कारवाई न करता त्यांची गांधीगिरी पद्धतीने मास्क आणि गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्याचा अभिनव उपक्रम राबविला.

बिनखांबी गणेश मंदिर परिसरात महापालिकेच्यावतीने अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्या हस्ते आणि नगरसेवक तौफिक मुलानी, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, सहायक आयुक्त संदीप घार्गे, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव आदी मान्यवरांच्या हस्ते विनामास्क फिरणाऱ्यांना मोफत मास्क आणि गुलाबपुष्प देण्यात आले. या गांधीगिरीमुळे शहरात सर्वजण या पुढील काळात मास्क वापरून महापालिका प्रशासनास सहकार्य करतील, अशी अपेक्षा अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी यावेळी व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER