महापालिकेचा दावा फोल, पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई, सखल भागात पाणी साचले

Maharashtra Today

मुंबई : मान्सूनच्या(Monsoon) पहिल्याच मुसळधार पावसाने मुंबई महापालिकेच्या(Municipal Corporation) नालेसफाईचे दावे खोटे ठरविले. अनेक उपाययोजनांनंतरही मुंबईतील अनेक सखल भाग पाण्याखाली गेले. हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे मुंबई आणि उपनगर परिसरात बुधवारी सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या दोन ते तीन तासांपासून पाऊस सुरु आहे. त्यामुळे मुंबईतील सखल भागांमध्ये नेहमीच्या प्रथेप्रमाणे पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. चाकरमान्यांना कामावर जाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्याप्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनांना पाण्यातून वाट काढणे अवघड झाले आहे. परिणामी या भागात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. थोड्याचवेळात समुद्रालाही मोठी भरती येणार आहे. या काळात पाऊस असाच सुरु राहिल्यास या भागांमध्ये आणखी पाणी तुंबण्याची शक्यता आहे. सायनमध्ये अनेक घरे आणि दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. शहर आणि उपनगराच्या परिसरात पहाटेपासून संततधार पाऊस पडताना दिसत आहे. हवामान खात्याने 9 ते 13 जूनदरम्यान मुंबई आणि परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. हा अंदाज आता काहीप्रमाणात खरा ठरताना दिसत आहे.

दरवर्षी कितीही पाऊस आला तरी दक्षिण मुंबईत पाणी जमा होत नव्हते. मात्र आज दक्षिण मुंबईतील अनेक भागात पाणी जमा झाले आहे. मुंबई, उपनगर, ठाणे, नवी मुंबई, पनवेल या विभागांमध्ये पहाटेपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली. सुरूवातीला पावसाचा जोर कमी होता पण नंतर मुसळधार पाऊस पडण्यास सुरूवात झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button