नाशिक घटनेनंतर पुण्यातील खासगी रुग्णालयांसाठी पालिकेचा नवा आदेश !

Nashik Oxygen Leak - Pune Municipal Corporation

पुणे : नाशिकमध्ये ऑक्सिजन (Oxygen) पुरवठ्याअभावी २४ रुग्णांना जीव गमवावे लागले. त्यानंतर आता संपूर्ण राज्यातील आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. विविध ठिकाणी ऑक्सिजन पुरवठा किंवा इतर आरोग्यव्यवस्था कशी आहे, याचा आढावा घेत आहेत. अनेक ठिकाणी लहानमोठ्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. पुण्यातही महापालिकेने (Pune Municipal Corporation) सर्व खासगी रुग्णालयांना ऑक्सिजनशी संबंधित सुविधांचे ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पुण्यात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता खासगी रुग्णालयांना कोविड रुग्णालय म्हणून परवानगी देत रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  बर्‍याच खाजगी रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांच्या उपचारासाठी काही ठिकाणी बेड राखीव आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयामध्ये बऱ्याच प्रमाणात रुग्ण आहेत. अशा परिस्थितीमध्ये खासगी रुग्णालयात दुर्घटना होऊ नये, यासाठी महापालिकेने आता आढावा घ्यायला सुरुवात केली आहे.

नाशिक येथील दुर्घटनेनंतर रुग्णालयामध्ये असलेल्या ऑक्सिजनच्या व्यवस्थेबाबत माहिती घेतली जात आहे. पुणे महापालिकेच्यावतीने त्यांच्या हद्दीतील सर्वच खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा यंत्रणा, ऑक्सिजन साठवण्याची यंत्रणा आणि इतर संबंधित बाबींचे ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भाची सर्व माहिती घेऊन त्वरित अहवाल सादर करण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत. कोरोनाच्या संकटाशी दोन हात करताना दुसरे अनामिक संकट टाळण्यासाठी पुणे महापालिकेने हे पाऊल उचलले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button