महापालिका की सहकार संस्था निवडणुका : काँग्रेस-राष्ट्रवादीत रस्सीखेच

Elections

कोल्हापूर :- वर्षभर लांबणीवर पडलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याबाबत राज्य शासनाने नवा अध्यादेश काढला नाही. परिणामी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने सोमवारपासून (दि.१८) स्थगित केलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याची तयारी केली आहे. नवी मुंबई, कल्याण डोंबवली आणि कोल्हापूर महापालिका निवडणूक प्रथम घ्यावी, त्यानंतर मोठ्या सहकारी संस्थांची निवडणूक घ्यावी याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीत दोन मतप्रवाह आहेत. निवडणुकीबाबत नवा शासन आदेश येण्याची अपेक्षा सहकार विभागाला असल्याने संभ्रमावस्था वाढली आहे. दरम्यान, आदेश न आल्यास ठरल्याप्रमाणे निवडणुकींची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

सहकारी कायद्यानुसार जास्तीजास्त वर्षभर निवडणुका पुढे ढकलता येतात. त्यानंतर नवा कायदा करावा लागतो. राज्य सरकारने मागील अधिवेशनात ३१ मार्चनंतरच सहकारी संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात, याबाबतची नोट विधीमंडळात मंजूर करुन घेतली आहे. मात्र याबाबत अध्याप निर्णय झालेला नसल्याचे जिल्ह्यातील एका ज्येष्ठ आमदारांनी सांगितले. त्यामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुकीबाबत लवकरच नवा आदेश होणार असल्याचे बोलले जाते. गोकुळ, जिल्हा मध्यवर्ती बँक, पाच साखर कारखाने, २४ सहकारी बँका, पतसंस्था तसेच बाजार समितीच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. निवडणुका होणार असल्याने कार्यकर्त्यांत उत्साही वातावरण आहे. महापालिका निवडणूक अगोदर होणार की गोकुळ आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकांचा बार उडणार यावर राजकीय गणिते अवलंबून असल्याने निवडणूक तारखांबाबत उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER