‘तुम्ही तुमच्या पक्षातर्फे ट्रस्ट करा आणि मशीद बांधा’; सुधीर मुनगंटीवारांचा पवारांना सल्ला

Sudhir Mungantiwar-Sharad Pawar

मुंबई :- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लखनौमध्ये एका कार्यक्रमात बोलताना, राम मंदिरासाठी ट्रस्ट स्थापन होते, मग मशिदीसाठी का नाही, असा सवाल उपस्थित केला होता. त्यावर भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “जीवनभर शरद पवारांनी मतांचं तुष्टीकरण केलं. खुर्चीसाठी पार्टी फोडली. तुम्ही तुमच्या पक्षातर्फे ट्रस्ट करा आणि मशीद बांधा. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार ट्रस्ट स्थापन होतोय. मग आरोपांचे कारण काय?” असा सवाल मुनगंटीवारांनी पवारांना विचारला. टीव्ही-९ या मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

भाजपची सूज उतरतेय असं मंत्री छगन भुजबळ म्हणाले होते. त्याबाबतही मुनगंटीवारांनी उत्तर दिलं. “दोन-तीन नगरसेवक गेल्याने तारे तोडण्याचे कारण नाही. सत्ता गेल्यानंतरही कोल्हापूरमध्ये माजी खासदार धनंजय महाडिकांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे जे भाजपमधून गेले ते मुळात भाजपचे नव्हते. दोन-तीन मंडळी भाजपतून गेल्याने तुमचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. यांनी राज्यात सेवेचे काम सुरू ठेवण्याकडे लक्ष द्यायला हवे. ” असं मुनगंटीवार म्हणाले. महाविकास आघाडी सरकार हे गेल्या भाजप सरकारमधील मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे अहवाल विधिमंडळ अधिवेशनात मांडणार असल्याबाबत मुनगंटीवारांना विचारलं. त्यावर मुनगंटीवार म्हणाले, स्वागत आहे.

मागच्या युती सरकारमध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांवर आरोप झाले होते. सगळ्यांचेच अहवाल मांडले जावेत. कर नाही त्याला डर कशाला? रडणाऱ्यातले आम्ही नाही, आम्ही लढणाऱ्यांपैकी आहोत. त्यांची ईडी चौकशी लागली की रडतात. खरंच आश्चर्य वाटतं, सरकार यांचं असूनही हे विरोधी पक्षांसारखे वागतात. पोलीस तुमचं ऐकत नाहीत, मग सरकारमध्ये तुमची भूमिका काय? पोलीस केंद्राला माहिती देत असतील तर या प्रकरणात नक्कीच काही गंभीर आहे. कारण राष्ट्र अडचणीत येणार नाही ही त्यामागची भूमिका असावी. तुम्ही आपल्याच पोलिसांवर अविश्वास दाखवता? पोलिसांना संघटना काढण्याचा अधिकार असता तर त्यांनी तुमच्याविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केले असते. एल्गार-भीमा कोरेगाव प्रकरणात दोन चार्जशीट कोर्टात आहेत. या प्रकरणात न्याय प्रक्रियेला बाधा येईल अशी विधाने करू नयेत.

जवानांच्या अपमानाचे प्रकरण : आदित्य ठाकरेंचे ट्विट

अनिल देशमुख नावाचे गृहमंत्री आहेत. खरे गृहमंत्री तर शरद पवारच आहेत, असा हल्लाबोल सुधीर मुनगंटीवारांनी केला. हे सरकार स्थगिती सरकार आहे. बाप-बेटा, मामा-भाच्याचे सरकार आहे. सरकारच्या कालावधीचा उपयोग गरिबांच्या उन्नतीसाठी करा. आधी पार्टी, मग आघाडीचे नाव काय असावे यावर वेळ घालवला.

मग मंत्री कोण? खाती कुणाला? प्रिंटिंग मिस्टेक यात वेळ घालवला. यांचे सरकार म्हणजे पेट्रोल खर्च होतेय, स्टेरिंग हलतंय, पण गाडी काही केल्या पुढे जात नाही. सात अजुबे इस दुनिया मे आठवा अजुबा ये सरकार… अशी टोलेबाजी मुनगंटीवारांनी केली. मंत्रिपदाचा दर्जा मिळालेल्या रवींद्र वायकर आणि अरविंद सावंत यांचे राजीनामे शिवसेनेने घेऊन ठेवल्याची माहिती आहे.

त्याबाबत मुनगंटीवार म्हणाले, “कदाचित घाईघाईने काही निर्णय केल्यानंतर कुणीतरी लक्षात आणून दिलं असेल म्हणून राजीनामे घेतले असतील. मी अधिवेशन काळात पूर्ण माहिती घेणार आहे. कायदे, नियम जाणून न घेता निर्णय घेतले की नाचक्की होते. मित्र असलेली शिवसेना दूर गेली तरी २५ वर्षे नाते राहिले आहे. सत्तेसाठी नाती तुटली तरी आम्हाला त्यांची चिंता आहेच. ” त्यांचा राज्यसभेचा सदस्य कोण असावा हे मी कसे सांगणार, तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. पण अलीकडे उद्धव ठाकरे शरद पवारांचे मार्गदर्शन घेतात. त्यामुळे राज्यसभेच्या सदस्य निवडीसाठी ते पवारांचे मार्गदर्शन घेतील, असाही टोला मुनगंटीवारांनी लगावला.