मुखपाक – त्रासदायक मुखरोग !

Mumps

मुखपाक म्हणजेच तोंडाला फोड येणे किंवा तोंड येणे अशा नावाने परीचयाचा हा रोग, जेवण सुद्धा नकोसे करणारा आहे. जेवण करतांना तिखट सहन होत नाही. जीभ ओठाला फोड येणे मुख गुहा लाल वर्णाची झालेली दिसते. थंड किंवा गरम पदार्थाचा स्पर्श देखील असह्य होतो. जीभ जड वाटते. तोंड पूर्ण उघडण्यास त्रास होतो. मुखाला दुर्गंध येतो. अनेक क्रिम औषध घेऊन सुद्धा त्रास देणारा मुखपाक रोग. मुखपाक होण्याचे मुख्य कारण आहे पाचन बिघडणे.

 • अति तिखट, कच्चे खाणे अति खारट पदार्थ घेणे.
 • तळलेले, शिळे पदार्थ नियमित आहारात खाणे.
 • दात स्वच्छ न करणे, जेवणानंतर किंवा काही खाल्ल्यानंतर गुळण्या न करणे.
 • पोटावर झोपणे किंवा डोके झुकलेले अवस्थेत झोपणे.
 • रोज पोट साफ न होणे. ( बद्धकोष्ठता)
 • दही, लोणचे, पापड, चाटप्रकार यांचे सतत सेवन.
 • रात्री जागरण व दिवसा झोपणे.
 • अति चिंता क्रोध करणे.
 • तसेच अनेक जुन्या पाचन तक्रारीमुळे वारंवार तोंडाला फोड येतात.

मुखपाक झाला की काय करावे ते सुचत नाही व त्रास वेदना इतक्या असतात की सहनही होत नाही. अनेक घरगुती उपचार यावर सांगितले जातात. आयुर्वेदात यावर चिकित्सा काय ?

आहारात बदल – हे आवश्यक आहे. ज्यामुळे पित्त वाढते अशा पदार्थांचा त्याग करणे. तिखट मसालेदार पदार्थ तळलेले, कच्चे, शिळे पदार्थ.

बद्धकोष्ठता दूर करणे – यासाठी त्रिफळा चूर्ण, एरंड तेल, स्वादिष्ट विरेचन चूर्ण इ. रात्री गरम पाण्यासह घेणे. औषधी चूर्णांच्या गुळण्या करणे. आयुर्वेदात प्रतिसारण कवल गंडूष हे मुखपाकाकरीता सांगितले आहेत. प्रतिसारण म्हणजे चूर्ण अथवा चाटण व्रणांवर लावणे. गुळण्या म्हणजे कवल व गाल पूर्ण फुगेस्तोवर जास्त प्रमाणात औषधी काढा मुखगुहात धरून ठेवणे म्हणजे गंडूष.

 • त्रिफळा काढ्याने गुळण्या व्रण भरून काढतात. लाळ स्वच्छ करतात.
 • तुरटीच्या पाण्याने गुळण्या करणे.
 • चमेलीची पाने खूप वेळ चावून थुंकून देणे.
 • मध लावणे – मध व्रणांना ठिक करण्याचे काम करते त्यामुळे मधाचा वापर करावा.
 • जेष्ठमध पावडर व मधाचा लेप लावणे.
 • खदीर त्रिफळा काढा करून तोंडात भरून ठेवणे.
 • काळ्या मनुका खाणे – पोट साफ करण्याकरीता मदत करते. शिवाय शरीरात वाढलेले पित्त कमी करतात.
 • हलका आहार घ्यावा उदा. मूग , खिचडी, दूधी सारख्या फळ भाज्या, भाकरी इ. पदार्थ घेणे.
 • डाळींब आवळा हे पित्त कमी करणारे आहे त्यामुळे आहारात समावेश करावा.
 • धणे जीरे पाण्यात उकळवून काढा करून पिणे.
 • दूध तूप यांचे सेवन दैनंदिन जीवनात समावेश पित्त वाढू देत नाही.
 • कडक ब्रशचा वापर न करणे.
 • मुखगुहा स्वच्छ ठेवणे.

पंचकर्म चिकित्सा करणे हे वारंवार होणाऱ्या मुखपाकावर आवश्यक आहे. वाढलेल्या दोषांना शरीरातून बाहेर काढण्याकरीता पंचकर्म फायदेशीर ठरते. अनेक जीर्ण पित्त विकारांवर पोटातून औषध घेणे गरजेचे ठरते.

ayurveda

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER