मुंबई : ११ ऑगस्टला पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा

Mumbai Alert

मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत (Mumbai) झालेल्या मुसळधार पावसाने ५ ऑगस्टला वादळाचे रूप धारण केले. मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये रस्ते आणि गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत. मुंबईकर अजून या धक्क्यातून सावरले नसताना असाच मुसळधार पाऊस मुंबईत पुन्हा ११ ऑगस्टला होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबई पाऊस केंद्रीय हवामान खात्याचे संशोधक डॉक्टर जेनामनी यांच्यानुसार आगामी ११ ऑगस्टला पुन्हा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पालघर आणि ठाणे परिसरामध्ये आजही पाऊस होण्याची शक्यता असून उत्तर कोकणमध्ये आगामी दोन दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या २५ वर्षांत पहिल्यांदाच मुंबईत गेल्या २४ तासांत इतका जास्त पाऊस झाला. बंगालच्या उपसागराच्या तुलनेमध्ये अरबी समुद्र अधिक सक्रिय असल्यामुळे हा मुसळधार पाऊस झाला आहे. रात्री उशिरापर्यंत पाऊस झाला असता तर मुंबईत भयानक परिस्थिती निर्माण झाली असती असे ते म्हणालेत. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांत आणि महाराष्ट्रातील घाट भागात अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. कोकण गोव्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज आहे. मुसळधार पावसामुळे वाहतूक ठप्प झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. मंत्रालय, चर्चगेट, मुंबई विद्यापीठ आणि न्यायालयाचा परिसर जलमय झाला होता. अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. मध्यरात्रीपासून पावसाचा जोर जरा कमी झाला असला तरी आजही मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER