तासाभरात मुंबईतील वीजपुरवठा पूर्ववत होईल; उर्जामंत्र्यांचे आश्वासन

Nitin Raut - Mumbai Power Outage

मुंबई : वीज पुरवठा करणारा ग्रीड बंद पडल्यानं मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), नवी मुंबईसह (Navi Mumbai) अनेक ठिकाणचा वीज पुरवठा गेल्या काही तासांपासून खंडित झाला आहे. सोमवारी सकाळी अचानक वीज पुरवठा खंडित झाला. याचा परिणाम मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलवरही झाला आहे. तर ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, गेल्या मुंबई आणि लगतच्या परिसरात ठप्प असलेला वीजपुरवठा आणखी तासाभरात पूर्ववत होईल, असे आश्वासन उर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी दिले आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करता त्यांनी आश्वासन दिले आहे.

महापरेषणच्या 400KV कळवा पडघा GSI केंद्रात सर्किट 1 देखभाल-दुरुस्ती सुरु होती. यावेळी सर्व भार सर्किट 2 वर होता. मात्र, सर्किट 2 मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई आणि ठाण्यातील वीज गेल्याचेही नितीन राऊत यांनी सांगितले. यानंतर सर्किट 2च्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. आणखी तासाभरात वीजपुरवठा सुरळीत होईल, असेही राऊत यांनी म्हटले.

दरम्यान, वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे लोकलच्या वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाली असून प्रवासी अडकले आहेत. तसंच सिग्नल यंत्रणाही बंद झाली आहे. याशिवाय हॉस्पिटलमध्ये असलेल्या रुग्णांनाही वीज पुरवठा खंडित झाल्याचा फटका बसत आहे. मुंबई, दहिसर, चेंबूर, प्रभादेवी, मालाड, कांदिवली, वांद्रे, विले पार्ले, पवई या तर ठाण्यातही काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER