मुंबई पोलिसांचे शहरात मिशन ऑल आऊट

Mumbai Police's mission all out in the city

मुंबई :- देशावर दहशतवादी हल्ल्याचे सावट असतानाच स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्‍वभूमीवर कोणताही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलिसांनी शहरात मिशन ऑल आऊट राबविण्यास सुरुवात केली आहे. यासाठी मुंबईतील स्थानिक पोलीस ठाण्यांसह गुन्हेशाखा, शिघ्रकृतीदल, फोर्सवन, बॉम्ब शोधक व नाशक पथक, श्‍वान पथकांसह अन्य विभागांनाही अर्लट करण्यात आले आहे.

केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्याने अतिरेकी संघटनांकडून देशातील महत्वाच्या ठिकाणांना टार्गेट केले जाण्याची शक्यता तपास यंत्रणांकडून वर्तवत मुंबईसह 15 मोठ्या शहरामध्ये हायअर्लट जारी केला आहे. शहराच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत मोठ्याप्रमाणात वाढ करत महत्वांच्या ठिकाणी नाकाबंदी करुन पोलिसांनी संशयीत व्यक्ती, वस्तू, सामान, वाहाने यांची कसून तपासणी सुरु केली आहे.

शहरातील महत्वांच्या आणि अतिसंवेदनशील ठिकाणांसह जागोजागी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यातच स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी कोणताही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी शहरात मिशन ऑल आऊट राबविण्यास सुरुवात केली आहे. यात समाजकंटाकांसह पोलीस अभिलेखावरील गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे.