मुंबई पोलिस आयुक्त बर्वे यांच्या कार्यकाळाला मुदतवाढ नाही : गृहमंत्री

मुंबई :- मुंबईचे पोलिस आयुक्त संजय बर्वे हे शनिवारी सेवानिवृत्त होत असून त्यांच्या कार्यकाळाला मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे राज्य सरकारने आज म्हटले आहे. मुंबई पोलिस आयुक्तांना मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. मात्र बर्वे यांच्या जागेवर कोणाची नियुक्ती केली जाणार हे त्यांनी स्पष्ट केले नाही. 1987 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी बर्वे यांना दोनदा मुदतवाढ देण्यात आली आहे. पहिल्यांदा ऑगस्टमध्ये आणि दुस-यांदा मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये. त्यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त म्हणून 28 फेब्रुवारी 2019 साली पदभार सांभाळला होता.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गृहमंत्री देशमुख हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी शुक्रवारी रात्री भेटणार असून त्यानंतरच मुंबईच्या पुढील पोलिस आयुक्ताचे नाव ठरेल. शहर पोलिसांचा रेकॉर्ड डिजीटलाईज करण्याचा प्रोजेक्ट बर्वे यांच्या पत्नी आणि मुलांच्या फर्मला देण्यात आल्यामुळे ते बरेच चर्चेत होते. ही सेवा नि:शुल्क असून यापासून त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना कुठल्याही प्रकारचा आर्थिक लाभ होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा प्रोजेक्ट राज्यातील पूर्वीच्या भाजप सरकारने त्यांना ऑक्टोबरमधील विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी दिला होता. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे तो पुढे जाऊ शकला नाही.