नाईट लाईफ : आदित्य ठाकरेंच्या निर्णयाचे रोहित पवारांकडून कौतुक

मुंबई : युवा आमदार पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी पहिला निर्णय ‘मुंबई नाईट लाईफ’चा घेतला आहे. २६ जानेवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून नाईट लाईफ सुरू होणार आहे. या निर्णयाचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी कौतुक केले आहे.

काय म्हणाले रोहित पवार?
‘मुंबईमध्ये ‘नाईट लाईफ’ला परवानगी देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आणि याचं संपूर्ण श्रेय माझे मित्र आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना जातं. यामुळे मुंबईमध्ये वडापावच्या स्टॉलपासून तर हॉटेल, मॉल, दुकाने, मल्टिप्लेक्स हे २४ तास सुरू ठेवता येणार आहेत. सध्या फक्त तारांकित हॉटेलमध्येच कॅफे २४ चालू ठेवण्यास परवानगी आहे. परंतु नवीन निर्णयाचा सामान्य जनता आणि उद्योग-व्यावसायिक या दोघांनाही फायदा होईल, असं मला वाटतं. म्हणून हा निर्णय स्वागतार्ह असून मुंबईला निश्चितच पर्यटनाच्या दृष्टीने एक महत्त्वाचं शहर बनवेल याची मला खात्री वाटते.

मुंबईत येत्या 26 जानेवारीपासून ‘नाईट लाईफ’

या निर्णयाबद्दल आदित्य ठाकरे यांचं मी अभिनंदन करतो.’ असं रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे. ‘दिवसेंदिवस सगळीकडे भीषण बनत चाललेल्या वाहतुकीच्या प्रश्नावर आणि त्यामुळे वाढत असलेल्या प्रदूषणाच्या समस्येवरही काही प्रमाणात नियंत्रण मिळवण्यासाठी या निर्णयाचा फायदा होईल.

प्रत्येक व्यावसायिक स्वेच्छेनं आपलं दुकान किंवा आस्थापना सुरू ठेवू शकतो. त्यासाठी त्यांना कोणतीही सक्ती करण्यात येणार नाही.’ असं रोहित पवारांनी लिहिलं आहे. ‘दारू विक्री करणारे रेस्टॉरंट आणि दुकाने २४ तास उघडी ठेवता येणार नाहीत. तर सध्याच्या नियमानुसारच मध्यरात्री दीड वाजेपर्यंतच त्यांना दुकाने उघडी ठेवता येणार आहेत. ’ असं रोहित पवारांनी स्पष्ट केलं आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर घेण्यात आलेल्या या निर्णयाचे विकासाच्या दृष्टीने सकारात्मक परिणाम दिसतील, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.