मजुरांसाठी जास्तीत जास्त रेल्वे सोडा; शरद पवारांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

मुंबई :- औरंगाबाद येथे मजुरांचा रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर या मजुरांना त्यांच्या घरी सुखरूप पोहचविण्यासाठी आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सरसावले आहेत. या संदर्भात पवारांनी थेट रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना फोन करून या मजुरांसाठी जास्तीत जास्त रेल्वे सोडण्याची मागणी केली आहे.

शरद पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, आपल्या गावाकडे जाण्यासाठी अनेक मजूर महाराष्ट्रात अडकून पडले आहेत. त्यांना गावाला जायचे असल्याने हे लोक पायी चालत आहेत. त्यामुळे या मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी रेल्वेची व्यवस्था करावी. महाराष्ट्र सरकारने या मजुरांसाठी बस वाहतुकीची व्यवस्था केली आहे. त्यामुळे तुम्हीही जास्तीत जास्त रेल्वेगाड्या सोडाव्यात, अशी मागणी शरद पवार यांनी गोयल यांच्याकडे केली असून गोयल यांनीही मजुरांसाठी अधिकाधिक रेल्वे सोडण्याचं आश्वासन दिलं आहे. इतकेच नाही तर पवार यांनी राज्यातील मजुरांच्या समस्येबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही चर्चा केली.