या कलाकारांनाही मुंबई मनपाने पाठवली होती नोटीस

Sharukh Khan & Priyanka Chopra & Arjun Kapoor

सुशांत मृत्यू प्रकरण हत्या की आत्महत्या यावरून ड्रग्जकडे वळले आणि एक नवा अध्याय सुरु झाला. कंगना रनौतने (Kangana Ranaut) सुशांतची बाजू घेऊन वादात भर टाकलीच होती. त्यातच ड्रग्जचा अँगल समोर आला आणि कंगनाने अख्ख्या बॉलिवुडला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. यातच कंगनाने राज्य सरकारवर टीका केली आणि शिवसेना (Shivsena) चवताळून उठली. शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मुंबई मनपाने लगेचच कंगनाच्या खार येथील घरावर अनधिकृत बांधकाम असल्याची नोटीस चिकटवली आणि लगेचच तोडकामही सुरु केले. कंगनाने आता हे प्रकरण न्यायालयात नेले असून जर कंगनाची बाजू सरस ठरली तर मुंबई मनपाला तोडलेल्या सगळ्या कामाचा खर्च कंगनाला द्यावा लागणार आहे.

परंतु हे काही प्रथमच झालेले नाही. यापूर्वीही अनेक चित्रपट कलाकारांना मुंबई मनपाने अनधिकृत बांधकामाबाबत नोटीस दिली होती. काही कलाकारांचे बांधकामही तोडून टाकले होते. तर काही कलाकारांचे अनधिकृत बांधकाम दंड वसूल करून नियमित केले होते. दंड वसूल करून बांधकाम नियमित केलेल्यांमध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे नाव आघाडीवर आहे. गोरेगाव पूर्व येथे सात बंगले आहेत. या बंगल्याची मालकी अमिताभ बच्चन, राजकुमार हिरानी, ओबेरॉय रियालिटर्स आणि अन्य लोकांकडे आहे. या बंगल्यांमध्ये अनधिकृत बांधकाम केल्याने पालिकेने एमआरटीपी 53(1) कायद्याअंतर्गत नोटीस बजावली. या बंगल्यांच्या मालकांनी वास्तुविशारद शशांक कोकीळ अँड असोसिएट्स यांच्यामार्फत सुधारित आराखडा मंजुरीकरिता पाठवला. मुंबई मनपाने दंड आकारून अनधिकृत बांधकाम नियमित करण्यात आले.

अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील प्रतीक्षा बंगल्याचा काही भाग रस्त्याच्या रुंदीकरणात जात होता. मनपाने तो भाग द्यावा असे अमिताभला सांगितले होते. अमिताभच्या शेजाऱ्यांनी जमीन दिली पण अमिताभने दिली नाही. यावर मात्र मुंबई मनपाने काहीही कारवाई केली नाही.

2015 मध्ये शाहरुख खानने आपल्या मन्नत बंगल्याबाहेर अनधिकृत बांधकाम केले होते. मुंबई मनपाने नोटीस दिल्यानंतरही शाहरुखने ते न तोडल्याने मनपाने ते तोडून टाकले होते. यानंतर दोन वर्षांनी म्हणजे 2017 मध्ये शाहरुख खानच्या रेड चिली कंपनीच्या कार्यालयातील दोन हजार चौरस फुटांच्या अनधिकृत कँटीनबाबत नोटीस दिली होती. शाहरुखने हे बांधकाम न पाडल्याने मुंबई मनपाने ते पाडले. त्यानंतर एकाच वर्षाने पुन्हा एकदा मुंबई मनपाची नजर शाहरुखकडे वळली. शाहरुखने मन्नत बंगल्याच्या बाजूच्या गल्लीत आपली व्हॅनिटी व्हॅन उभी करण्यासाठी रस्त्यावर रॅम्प बांधला होता. यासाठीही शाहरुखला नोटीस देऊन तो काढून टाकण्यास सांगितले होते. परंतु शाहरुखने न ऐकल्याने मनपाने रॅम्प तोडून टाकला आणि त्याच्याकडून या कामाचा खर्चही वसूल केला.

अभिनेत्री प्रियांका चोप्राच्याही अंधेरी पश्चिम येथील ऑफिसमधील अनधिकृत बांधकामावर मुंबई मनपाची नजर गेली होती. प्रियांका परदेशात असताना मनपाने बांधकाम पाडण्याची नोटीस दिली होती. या नोटीसचे पुढे काय झाले त्याची काहीही माहिती उपलब्ध नाही.

अर्शद वारसीच्या वर्सोवा येथील बंगल्यात अऩधिकृत बांधकाम केल्याचे मनपाच्या लक्षात आले होते. मनपाने ते बांधकाम तोडण्याची नोटीस अर्शद वारसीला बजावली. परंतु त्याने स्वतः अनधिकृत बांधकाम न तोडल्याने मनपाने ते बांधकाम तोडले होते.

चार वर्षांपूर्वी प्रख्यात कॉमेडियन कपिल शर्माने मुंबई मनपाचे अधिकारी लाचखोर असून पैसे मागत असल्याचे म्हटले होते. यासाठी त्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विट केले आणि देशभर हंगामा झाला. त्यानंतर मनपा लगेचच जागी झाली आणि कपिल शर्माने घरात अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी त्याला नोटीस दिली. त्याने बांधकाम न तोडल्याने मनपाने बांधकाम तोडले होते. कपिल शर्माचा फ्लॅट असलेल्या गोरेगाव येथील इमारतीकडे ओसी आणि सीसी असतानाही मनपाने काही भाग अनधिकृत असल्याची नोटीस बजावली होती. याच प्रकरणात कपिलने थेट पंतप्रधानांकडे तक्रार केली होती. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले.

अभिनेता अर्जुन कपूरने तो राहात असलेल्या इमारतीच्या गच्चीत जिम उभारले होते. इमारतीतील अन्य रहिवाशांनी याची तक्रार मनपाकडे केली. मनपाने लगेचच अर्जुन कपूरला नोटीस बजावली आणि बांधकाम तोडण्यास सांगितले. परंतु अर्जुनने बांधकाम न तोडल्याने मनपाने ते बांधकाम तोडून टाकले होते. याशिवाय टीव्ही आणि इंडस्ट्रीत काम करणाऱ्या अनेकांच्या बांधकामांवर मनपाने नोटीस बजावली असावी परंतु त्याची माहिती उपलब्ध नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER