पॅरिसप्रमाणे मुंबई मेट्रोचे मार्ग होणार ‘कलरफुल’!

Mumbai Metro routes to become colourful

मुंबई : मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीए आता मुंबई मेट्रो मार्गांचा चेहरामोहरा बदलवीत आहे. अगदी पॅरिसप्रमाणे मेट्रोचे मार्ग ‘कलरफुल’ होणार आहेत. दिलेल्या रंगांवरून प्रवाशांना नेमके कुठे जायचे आहे, याचा बोध होणार आहे. यासाठी मेट्रोने ‘मास्टर प्लॅन’ही आखला आहे. आपल्या प्रवासाचा नेमका प्रवेशमार्ग ओळखण्यासाठी ही रंगसंगती प्रवाशांना सहाय्यभूत होणार आहे.

मुंबईतील ३३७ किलोमीटर मार्गावर धावणार असलेल्या मेट्रोसाठी, जगातील चार सर्वोत्तम मेट्रो प्रकल्पांचा अभ्यास एमएमआरडीएने केला आहे. दिल्लीसह पॅरिसचाही यामध्ये समावेश आहे, हे येथे उल्लेखनीय.

मुंबईतील प्रत्येक मेट्रोस्थानकात जाण्यासाठी पांढर्‍या रंगाची पट्टी, तर, स्थानकातून बाहेर निघताना हिरव्या रंगाची पट्टी प्रवाशांना मार्गदर्शन करेल. ‘रिबीन’ नावाने ही संकल्पना ओळखली जाते.

सध्या मेट्रो-२ बी आणि मेट्रो-७ या दोन मार्गांसाठी रंगनिश्चिती करण्यात आली आहे. पिवळा रंग हा ‘मेट्रो-२ बी’साठी ठरविण्यात आला आहे. ‘मेट्रो-७’साठी लाल रंग आहे.