माझे कुटुंब, माझी जबाबदारी हा मंत्र पुढेही पाळण्याची गरज – सामना

माझे कुटुंब माझी जबाबदारी - सामना

मुंबई : दिल्लीत (Delhi) कोरोनाची (Corona) दुसरी लाट (Second Wave) आल्याची चाहूल लागल्यानं महाराष्ट्रातील ठाकरे सरकारही सतर्क झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही (CM Uddhav Thackeray) दुसरी लाट ही लाट नसून त्सुनामी असल्याचं सांगितलं. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून नागरिकांना सजग आणि सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दिल्लीसह काही राज्यांमध्ये कोरोनाच्या नव्या लाटेची चिंता व्यक्त होत असताना कोरोना लसीकरणाची चाहूल आश्वस्त करणारी आहे. अर्थात हे सगळे अजून तरी जर-तरच्या पातळीवरच आहे. त्यामुळे कोरोनाबाबत मागील सात-आठ महिन्यांपासून आपण जी सतर्कता बाळगत आहोत, खबरदारी घेत आहोत ती पुढेही घ्यावीच लागेल. कोरोना लसीची चाहूल देणा-या बातम्या दिलासादायक नक्कीच आहेत, पण त्याच वेळी कोरोनाच्या दुसऱया लाटेचे तडाखे काही ठिकाणी बसू लागले आहेत. या धोक्याची टांगती तलवार मुंबई-महाराष्ट्रावरही आहे, हे विसरून चालणार नाही. आपल्याला सजग आणि सतर्क राहावेच लागेल, असा सल्ला सामनाच्या अग्रलेखातून देण्यात आला आहे.

सामनाच्या अग्रलेखातील ठळक मुद्दे

दिल्लीसह गुजरात, मध्य प्रदेशमधील काही शहरांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरू झाला आहे. त्यामुळे तेथील राज्य सरकारे तर सतर्क झाली आहेतच, पण मुंबई-महाराष्ट्रालादेखील हाय ऍलर्ट राहावे लागणार आहे. कारण अनलॉक-5 प्रक्रियेमध्ये अनेक व्यवहार सुरू झाले आहेत. दळणवळण, वाहतूकही होऊ लागली.

दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आदी राज्यांमधून आवक-जावक सुरू झाली आहे. मुंबई हे सर्वच मार्गांनी देश आणि परदेशांशी जोडले गेलेले आर्थिक राजधानीचे शहर आहे. त्यामुळे बाहेर वाढलेल्या कोरोनाच्या धोक्याचा सर्वाधिक इशारा मुंबई आणि महाराष्ट्रालाच आहे. महाराष्ट्र सरकारनेही त्यादृष्टीने सर्व आघाडय़ांवर तयारी केलीच आहे. जिल्हा प्रशासनांना सतर्क करण्यात आले आहे. जनतेला दुसऱ्या संभाव्य लाटेच्या परिणामांची जाणीव करून देण्याचा प्रयत्नही सुरूच आहे.

स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही दोन दिवसांपूर्वी जनतेशी याचसंदर्भात संवाद साधला आणि खबरदारी घेण्याचे आवाहन केले. प्रश्न आहे तो विरोधकांचा. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका समोर असूनही त्यांचे वेगळेच सुरू आहे. राज्य सरकार एकीकडे कोरोना उपायांची केंद्र सरकारनेच घालून दिलेली त्रिसूत्री काटेकोरपणे अमलात आणत असताना विरोधी पक्षांचे वागणे त्यालाच छेद देणारे असेल तर कसे व्हायचे? तरीही राज्य सरकार आपल्या परीने कोरोनाचा कमी झालेला प्रादुर्भाव पुन्हा वाढू नये यासाठी पावले उचलत आहेच.

सावधानता बाळगत जनजीवन पूर्वपदावर आणायचे आणि कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही याची काळजीही घ्यायची हे शिवधनुष्य पेलण्यास राज्य सरकार समर्थ आहे. जनतेने माझे कुटुंब, माझी जबाबदारी हा मंत्र पुढेही पाळण्याची गरज आहे. सरकारचे प्रयत्न आणि जनतेचा सहयोग यामुळेच महाराष्ट्रातील कोरोना प्रादुर्भावावर नियंत्रण प्रस्थापित करण्यात यश आले आहे. मात्र कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. त्यातल्या त्यात दिलासा इतकाच की, आता कोरोनाबरोबरच लसीच्या बातम्याही जास्त येऊ लागल्या आहेत. वेगवेगळ्या देशांमधील कोरोना लसींच्या चाचण्या, त्यात मिळालेले यश, त्या लसी सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्याचे नियोजन आणि त्यांचे वितरण अशा अनेक गोष्टींवरही चर्चा होऊ लागली आहे.

सरकारी पातळीवरून त्याबाबत खुलासे होऊ लागले आहेत. राज्यातही हे लसीकरण आणि तिचे वितरण याबाबत सरकारने एक टास्क फोर्स तयार केला आहे. पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) हे त्यांच्या संभाव्य पुणे भेटीत कोरोना लस निर्माण करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार असे सांगितले जात आहे. कोरोनाच्या लसीसंदर्भात या सगळ्या घडामोडी महत्त्वाच्या आहेत, असंही सामनाच्या अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER