मुंबईत कोरोनाप्रतिबंधक मास्कचा तुटवडा, यंत्रणेचे दुर्लक्ष- संशयित रुग्णाचा गंभीर आरोप

Corona Virus

मुंबई : भारतासह जगभर सध्या घबराट पसरविलेल्या कोरोना विषाणूच्या विविध बातम्या पुढे येत आहेत. मुंबईत कोरोनाप्रतिबंधक मास्कचा तुटवडा पडलेला आहे. तब्बल २० हजार मास्क चीनला पाठविण्यात आल्याने हा तुटवडा निर्माण झाला आहे, हे विशेष. दुसरीकडे, यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप कोरोनाच्या संशयित रुग्णाने केला आहे.

हवेतून संसर्ग होत असल्याने मास्क घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळेच चीनने भारतातून मास्क मागविले आहेत. एकटय़ा मुंबईतून २० हजारावर मास्क चीनला पाठविण्यात आल्याने मुंबईकरांना ‘एन ९५’ या प्रकारातील कोरोनाप्रतिबंधक मास्क मिळत नसल्याची स्थिती आहे. मुंबईतील व्यापारी मंडळी मागील दोन आठवडय़ांमध्ये हे मास्क चीनला घेऊन गेल्याचे औषध व्यावसायिकांनी म्हटले आहे. याबाबतचे वृत्त आज शुक्रवारी एका इंग्रजी दैनिकाने दिले आहे.

कोरोनाच्या लढाईत आता खाजगी इस्पितळे आणि केंद्राची चमू, राज्यात एकही कोरोनारुग्ण नाही- टोपे

दरम्यान, कोरोना विषाणूच्या जागरुकतेबाबत विमानात माहिती देत नाहीत, कुठलीही घोषणा विमानतळावरही करण्यात येत नाही, असे चीनला जाऊन भारतात परत आलेल्या एका प्रवाशाने म्हटले आहे. या प्रवाशाला कोरोनाच्या संभाव्य लक्षणांवरून मुंबईतील कस्तुरबा इस्पितळात दाखल करण्यात आले होते. या इस्पितळातील व्यवस्था अपुरी असून, संसर्ग नियंत्रणासाठी व्यवस्था अपुरी असल्याची तक्रार त्याने माध्यमांशी बोलताना केली आहे. या रुग्णावर संसर्गमुक्तीचे उपचार करून त्याला सुट्टी देण्यात आली आहे.